येस बँक घोटाळा प्रकरणी अखेर राणा कपूर यांना जामीन मंजूर

मुंबई

येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी राणा कपूर यांना विशेष न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राणा कपूर यांना काल विशेष न्यायालयाने तब्बल ४ वर्षांनी जामीन मंजूर केला. राणा येस बँकेचे सह-संस्थापक आहेत. येस बँकेशी संबंधित ४६६ कोटी ५१ लाखांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. येस बँकेशी संबंधित घोटाळ्याप्रकरणात सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे.

आर्थिक अनियमितता आणि बेहिशेबी कर्जवाटप प्रकरणी मार्च २०२० मध्ये राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची पत्नी बिंदू यांच्यासह मुली रोशनी आणि राधा कपूर खन्ना यांनाही अटक करण्यात आली. या तिघींना मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली होती. त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सीबीआय न्यायालयाने दिलेला आदेश अत्यंत बेकायदेशीर आणि अयोग्य असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. याचिकेत म्हटले होते की, तिघींनी सीबीआयला तपासात संपूर्ण सहकार्य केले होते. या प्रकरणातील सर्व पुरावे कागदोपत्री स्वरूपाचे असून आधीच सीबीआयच्या ताब्यात आहेत आणि त्यामुळे कागदपत्रांशी किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच कथित आर्थिक व्यवहारांमध्ये किंवा येस बँकेमध्ये तसेच त्यांच्या दैनंदिन व्यवहारात आपली कोणतीही भूमिका नव्हती.
या याचिकेत करण्यात आलेले दाव्यांना सीबीआयने विरोध केला. या तिघींच्या नावावर काही कंपन्या असून त्या कंपन्यांना दिलेली बेहिशेबी रक्कम यांच्या खात्यात जमा झाल्याचे पुरावे सापडल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top