‘रक्त नात्यातील सगेसोयरे’ वरून मतभेद चर्चा फिस्कटली! ‘सरसकट’ फेटाळला

जालना- मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आज अंतिमतः सुटणार असे वाटत असतानाच पत्नी आणि तिच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही कारण तसा कायदा आहे असे सरकारच्या शिष्टमंडळाने स्पष्ट केले आणि या मुद्यावर सरकार व जरांगे पाटील यांच्यातील चर्चा फिस्कटली. यामुळे संतप्त झालेल्या मराठा कार्यकर्त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळासमोर निदर्शने केली.
ज्या मराठ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्या वडिलांकडच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार हे निश्चित झाले आहे. सरकार आणि जरांगे पाटील यांचे याबाबत एकमत आहे. पण सरकारने आधीच्या उपोषणावेळी जरांगे पाटील यांना आश्वासन देताना कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तीच्या ‘रक्ताच्या नात्यातील सगेसोयरे’ यांना प्रमाणपत्र दिले जाईल असे आश्वासन दिले होते. या शब्दावरून मतभेद आहेत. जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे की, सोयरे म्हणजे व्याही, म्हणजे आईकडील नातेवाईक असा होतो. त्यामुळे वडिलांच्या सर्व नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळणार तसेच आईकडील नातेवाईक म्हणजे पत्नी, मामा, भाचे या सर्वांनाही कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल असे सरकारने लेखी आश्वासन दिले आहे. थोडक्यात, जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे की एकीकडे कुणबी प्रमाणपत्र मिळाले की आई-वडील दोघांच्या सर्व नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळायला हवे. म्हणजेच सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळून ओबीसीत आरक्षण मिळेल.
हाच खुलासा सरकारने करावा, ‘रक्त नात्यातील सगेसोयरे’ म्हणजे कोण ते लिखित स्पष्ट करावे ही जरांगे पाटील यांची मागणी होती. आई-वडील दोघांकडील नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकार घेईल असे जरांगे पाटील यांना वाटले होते. यामुळेच आज सरकारचे शिष्टमंडळ म्हणून मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपन भुमरे आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिव मंगेश चिवटे हे त्यांना भेटायला अंतरवाली सराटीत आले तेव्हा जरांगे पाटील खुशीत होते. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. आज प्रथमच माईक बंद करून चर्चा सुरू झाली आणि मग ‘रक्त नात्यातील सगे सोयरे’ या शब्दावर अडली. सगेसोयरेचे आश्वासन दिले होते याची खात्री देण्यासाठी मागील वेळेस शिष्टमंडळात उपस्थित असलेले बच्चू कडू यांनाही फोन लावण्यात आला.
मंत्री गिरीष महाजन हे समजावून सांगत होते की, रक्त नाते म्हणजे वडिलांकडील नातेवाईक असाच कायदा आहे. देशभरात हाच कायदा आहे. सर्व जातींना प्रमाणपत्र देताना हाच कायदा लागू होतो. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देतानाही हाच कायदा लागू होणार आहे. सोयरे म्हणजे व्याही असे म्हणतात. तो शब्द घातल्याने आईकडील सर्व नातेवाईकांनाही प्रमाणपत्र मिळणार असा जरांगेचा गैरसमज झाला. आम्ही सगेसोयरेचा अर्थ रक्तातील नाती म्हणजेच वडिलांकडील नातेवाईक असाच घेतला होता कारण कायदा तोच आहे. वडील, त्यांची मुले, काका, पुतणे यांना प्रमाणपत्र मिळते. पण आई, मामा, मावशी भाचे यांना प्रमाणपत्र देण्याचा कायदाच नाही. महिलेकडे आरक्षण जात नाही हे कायदा सांगतो. सोयरे या शब्दाचा शब्दश: अर्थ घेता येणार नाही. आईच्या दाखल्यावरून जात ठरत नाही. जे शक्य नाही ते आम्हाला देता येणार नाही.
गिरीश महाजन ही बाब समजावत राहिले. त्यांनी पत्रकार परिषदेतही हेच समजावून सांगितले. पण जरांगे पाटील यांना हे मान्य नाही. तुम्ही सरसकट शब्दाऐवजी सगेसोयरे हा शब्द घेतो म्हणाला होतात त्याप्रमाणेच द्या यावर ते ठाम राहिले. त्यामुळे कोंडी फुटली नाही. आता 23 डिसेंबरला मुंबईकडे मराठा मोर्चा कूच करण्याचा निर्णय होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top