Home / News / रत्नागिरीत मुसळधार पाऊस! दरड कोसळली कोकण रेल्वे 24 तास ठप्प! प्रवाशांचे हाल

रत्नागिरीत मुसळधार पाऊस! दरड कोसळली कोकण रेल्वे 24 तास ठप्प! प्रवाशांचे हाल

चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने कोकण रेल्वे काल सायंकाळपासून...

By: E-Paper Navakal

चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने कोकण रेल्वे काल सायंकाळपासून सुमारे चोवीस तास ठप्प झाली. या मार्गावरील अनेक एक्स्प्रेस गाड्या ठिकठिकाणी रखडल्या होत्या. तर किमान 12 एक्स्प्रेस गाड्या अन्य मार्गांवर वळविण्यात आल्या. रुळांवर थांबलेल्या गाड्यांमध्ये रात्रभर अडकून पडलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. त्यांच्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून खाण्या-पिण्याची काहीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले. ज्या गाड्या रद्द झाल्या त्या गाड्यांची वाट पाहत तासन्तास ताटकळत राहिलेल्या प्रवाशांनी रत्नागिरी स्थानकावर तिकिटाचे पैसे परत करण्याची मागणी करीत गोंधळ घातला. दरम्यान, सायंकाळी दिवाणखवटी येथे रुळांवर साचलेला चिखलगाळ पूर्णपणे साफ केल्यानंतर सायंकाळी या मार्गावर मांडवी एक्स्प्रेससह काही गाड्यांची वाहतूक सुरू झाली.
सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड आणि विन्हेरे दिवाणखवटी या स्थानकांदरम्यान दरड कोसळल्याने मातीचा ढिगारा रेल्वे रुळांवर कोसळला. हा ढिगारा जेसीबीच्या सहाय्याने उचलण्याचे काम आज बरेच तास सुरू होते. त्यामुळे श्री गंगानगर एक्स्प्रेस कामथे स्थानकात अडकून पडली. मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकात तर दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी दिवाणखवटी स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती.
कोकण रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक आज सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत झाली नाही. अनेक एक्स्प्रेस रेल्वे गाड्या ठिकठिकाणी रुळांवरच अडकून पडल्या.
कोचीवेल्ली एक्स्प्रेस काल रात्रीपासून सुमारे 17 तास चिपळूण स्थानकात उभी होती. ही गाडी चार तास उशिराने धावणार असे सुरुवातीला प्रवाशांना सांगण्यात आले होते. मात्र संपूर्ण रात्र उलटून सोमवारचा दिवस उजाडला तरी गाडी जिथल्या तिथेच होती. गाडीतील शौचालयांमधील पाणी संपल्यामुळे रात्रभर अडकून पडलेल्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. त्यामुळे प्रवासी प्रचंड संतापले.
आज सकाळी कोकण रेल्वे प्रशासनाने कोकणकन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, रत्नागिरी-दिवा पॅसेंजर, जनशताब्दी एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर, मुंबई -मंगळूर एक्स्प्रेस, मडगाव एक्स्प्रेससह सुमारे 12 गाड्या रद्द केल्या.
अखेर सकाळपासून मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एसटी बस उपलब्ध करून दिल्या. सुमारे 68 एसटी बस गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.त्यापैकी 40 गाड्या रत्नागिरी स्थानकावर, 18 गाड्या चिपळूण स्थानकावर तर 10 गाड्या खेड स्थानकावर पाठविण्यात आल्या. मात्र रेल्वे गाडयांमधील प्रवाशांची प्रचंड संख्या पाहता एसटी सेवा अगदीच अपुरी ठरली.
दरम्यान, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत आजही पाऊस सुरू राहिला. पुढील चोवीस तास मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात आज रेड अलर्ट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला होता. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यांतील अनेक नद्यांना पूर आला. काल चिपळूण शहरात वशिष्ठी नदीचे पाणी शिरले होते. मात्र नंतर पावसाचा जोर ओसरल्याने रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे आज रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. रत्नागिरीत होणार्‍या परिक्षाही पुढे
ढकलण्यात आल्या.

Web Title:
संबंधित बातम्या