राममंदिरात भक्तांची तुफान गर्दी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात केला

अयोध्या – अयोध्येतील मंदिरात काल प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर आजपासून मंदिर भक्तांसाठी खुले झाले. मात्र, आज पहिल्याच दिवशी अयोध्येत प्रभूरामाच्या दर्शनासाठी भाविकांचा जणू जनसागरच लोटला. लाखो भाविक काल रात्री दर्शन घेऊ शकले नाहीत. ते रात्रीपासून दर्शनासाठी आतूर असल्यामुळे आज सकाळी 7 वाजण्याऐवजी पहाटे 3 वाजताच मंदिराचे दरवाजे उघडावे लागले. परंतु आत जाण्यासाठी भक्तांनी इतकी गर्दी केली की, सगळी व्यवस्था कोलमडली. त्यानंतर मंदिर परिसरात तातडीने पोलिसांसह रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या (आरएएफ) कमांडोंना पाचारण करण्यात आले. भाविकांना छोट्या गटांत सोडण्याचे नियोजन केले. गर्दीमुळे आणखी भाविकांनी पुढील दोन दिवस अयोध्येत येऊ नये, असे आवाहनही पोलिसांना करावे लागले.
गर्दीचे नीट नियोजन न केल्यामुळे अधिकार्‍यांवर नाराज झालेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने अयोध्येला जाऊन हेलिकॉप्टरमधून पाहणी केली.
आज पहिल्याच दिवशी लाखो भक्तांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. मात्र त्यासाठी काल रात्रीपासूनच मंदिर परिसरात भक्तांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी उभारलेली बॅरिकेड्स तोडून रामभक्तांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी भाविकांना सकाळी येण्यास सांगून परत पाठवले. परंतु परत न जाता रात्रीपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या. पहाटेनंतर ही गर्दी वाढत गेली. ‘जय श्री राम’चा जयघोष करत भाविकांचे जत्थेच्या जत्थे मंदिराच्या दिशेने येत होते. अखेर गर्दी लक्षात घेऊन पहाटे 3 वाजताच मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले, तेव्हा भाविकांची दर्शन घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. भाविक एकमेकांना धक्काबुक्की करत होते. त्यामुळे पोलिसांना भाविकांना आवरणे अवघड होऊ लागले. भाविकांच्या रेट्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरील डिव्हाईडर तुटले, बेरिकेड मोडले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्यामुळे गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची कुमक अयोध्येत बोलावण्यात आली. अतिरिक्त पोलीस महासंचालक सुजीत पांडेय यांनादेखील सकाळी अयोध्येत यावे लागले. भाविकांची गर्दी पाहून अखेर बाराबंकी पोलिसांनी भाविकांना अयोध्येला न येण्याचे आवाहन केले. या गर्दीची माहिती मिळाल्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तातडीने अयोध्येला आले. गर्दीचे नीट नियोजन न झाल्यामुळे ते अधिकार्‍यांवर नाराज झाले होते.
गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अयोध्येतील अनेक मार्ग वळवण्यात आले. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास अयोध्येत 1 लाख 70 हजार भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले होते. श्री रामांच्या शयनसाठी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत दरवाजे बंद ठेवण्यात येणार होते, मात्र भाविकांच्या दर्शनासाठी एक तास आधी म्हणजेच दुपारी 1 वाजता दरवाजे उघडण्यात आले. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या 2 आठवडे आधीपासून अयोध्येतील सर्व हॉटेलचे 80 टक्के बुकिंग झाले होते. अयोध्येतील हॉटेलमध्ये राहण्यासाठी पाच पट अधिक पैसे द्यावे लागत आहेत. काही आलिशान हॉटेलचे भाडे 1 लाखांपर्यंत गेले आहे. एवढे भाडे असूनही हॉटेल बुकिंग उपलब्ध नाही. दरम्यान, श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्राचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास म्हणाले की, प्राणप्रतिष्ठेनंतर गर्भगृह दैवी रुपात दिसत आहे. त्रेतायुगात जेव्हा भगवान राम विराजमान झाले होते, त्यावेळी जे वातावरण होते ते आज आहे.
अयोध्येतील सोहळ्याच्या लाईव्ह
प्रक्षेपणाचा यू ट्यूबवर नवा विक्रम
अयोध्येत काल राम मंदिराच्या उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. या सोहळ्याला अभिनय, संगीत, उद्योग, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली. ज्यांना या सोहळ्याला जाता आले नाही, त्यांनी यू ट्यूबवर या सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहिले. तब्बल 1 कोटी 90 लाख लोकांनी काल हा ऐतिहासिक सोहळा यू ट्यूबवर पाहिला. त्यामुळे या सोहळ्याने यू ट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपणाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत यू ट्यूब चॅनलवरुन या सोहळ्याचे 2 व्हिडिओ ब्रॉडकास्ट करण्यात आले होते. यातील एक व्हिडिओ एक कोटी लोकांनी लाईव्ह पाहिला, तर दुसरा व्हिडिओ 90 लाख लोकांनी लाईव्ह पाहिला. यामुळे यू ट्यूबवर नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. यू ट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या लाईव्ह प्रक्षेपणाच्या व्हिडिओंमध्ये पहिल्या क्रमांकावर प्रभू रामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. यानंतर दुसर्‍या क्रमांकावर चांद्रयान-3 च्या लँडिगचा व्हिडिओ आहे. चांद्रयान-3 चे लाईव्ह प्रक्षेपण 80 लाख 90 हजार लोकांनी
पाहिले होते.

श्रीराम मंदिराचे वेळापत्रक

राममंदिरात पहिली मंगला आरती पहाटे 4:30 वाजता होईल, ही आरती देवाला जागे करण्यासाठी केली जाते. त्यानंतर 5 वाजता शृंगार आरती होईल, यात यंत्रपूजा, सेवा आणि बालभोग होईल. सकाळी 7 ते 11:30 पर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल. दुपारी 1 ते 3 मंदिर बंद असेल. सायंकाळी 7 वाजता पुन्हा आरती होईल. रात्री 9 वाजता शयन आरती होईल. आरतीला उपस्थित राहण्यासाठी भाविकांना पास दिले जातील. जवळच्या श्रीरामजन्मभूमीच्या कॅम्प ऑफिसमध्ये पास देण्याची सोय करण्यात आली आहे. आरती सुरू होण्याच्या अर्धा तास आधी हे पास दिले जाणार आहेत. पाससाठी भाविकांना सरकारी ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे संकेतस्थळ येथूनही हे पास मिळवता येतील. मंदिरात मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास
मनाई आहे.

राममंदिर सोहळ्यामुळे पाकिस्तानला पोटशूळ
अयोध्येत सोमवारी झालेल्या राममंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात एक पत्रकच त्यांच्या एक्स समाजमाध्यमावर प्रसिद्ध केले आहे.
अयोध्येत असलेल्या मशीदीच्या जागेवर हे मंदिर बांधल्यामुळे भारताच्या लोकशाही चेहर्‍याला डाग लागला असल्याचे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे. भारतातल्या हिंदुत्व विचारसरणीमुळे जातीय सलोखा आणि प्रादेशिक शांततेला गंभीर धोका निर्माण झाला असून आंतरराष्ट्रीय समुदायानेही याची दखल घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे भारताने अल्पसंख्याक समुदायांच्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी या पत्रकात केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top