रामाला पादुका अर्पण करण्यासाठी वृद्धाची हैदराबाद ते अयोध्या पदयात्रा

हैदराबाद- प्रभू श्रीरामावरील अतूट भक्ती आणि आपल्या कारसेवक वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या इच्छेने शहरातील एका ६४ वर्षीय व्यक्तीने देवाला सोन्याच्या पादुका अर्पण करण्यासाठी येथून अयोध्येच्या दिशेने हजारो किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे. छल्ला श्रीनिवास शास्त्री असे या रामभक्ताचे नाव आहे. श्रीरामाने वनवासादरम्यान अवलंबलेल्या अयोध्या ते रामेश्वरम् या मार्गावरून ते उलट म्हणजे रामेश्वरम् ते अयोध्या असा पायी प्रवास करीत आहेत.प्रभू श्रीरामांनी स्थापित केलेल्या सर्व शिवलिंगांना स्पर्श करून उलट क्रमाने प्रवास करायची इच्छा होती.त्यासाठी २० जुलैपासून हा प्रवास सुरू केला,असे छल्ला शास्त्री यांनी सांगितले.या प्रवासात शास्त्री ओडिशातील पुरी, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर आणि गुजरातमधील द्वारका अशा अनेक ठिकाणांवरून पुढे गेले आहेत.आपण जवळपास आठ हजार किमीचे अंतर पायी चालत पार पाडणार आहोत. डोक्यावर रामाच्या पादुका ठेवून मार्गक्रमण करीत आहेत.अयोध्येत पोहोचल्यावर त्या पादुका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोपविणार असल्याचे शास्त्री यांनी सांगितले. वनवासात प्रभू श्रीराम कुठे-कुठे गेले,याचा १५ वर्षे अभ्यास करणारे आयकर विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ.रामावतार यांनी शोधलेल्या नकाशानुसार आपण अयोध्येच्या दिशेने पदयात्रा करीत असल्याचे शास्त्री म्हणाले.माझ्या वडिलांनी अयोध्येत कारसेवा केली होती.ते हनुमानाचे निस्सिम भक्त आहेत.अयोध्येत बांधलेले राम मंदिर पाहण्याची त्यांची इच्छा होती.मात्र,ते आता नाहीत. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा मी निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर राम मंदिराच्या उभारणीत योगदान म्हणून मी आतापर्यंत चांदीच्या पाच विटा दिल्या.सध्या मी सोन्याचा मुलामा दिलेल्या पादुका सोबत नेत आहे. त्या श्रीरामचंद्राला अर्पण करणार आहे,असे शास्त्री यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top