रासायनिक प्रदूषणामुळे ऐरोली खाडीत हजारो मृत माशांचा खच

नवी मुंबई- औद्योगिक क्षेत्रात असलेल्या लहान-मोठ्या रासायनिक कारखान्यांतील दूषित पाणी थेट खाडीत सोडले जात असल्याने त्याचा फटका दरवर्षी जलचरांना बसत आहे. ऐरोली खाडीसह आजूबाजूच्या खाडीतील वाढत्या रासायनिक प्रदूषणामुळे मासे मृत पावत आहेत. याचीच पुनरावृत्ती मागील तीन दिवसांपासून पाहायला मिळत आहे. तीन दिवसांत हजारहून अधिक माशांचा मृत्यू झाल्याने ऐरोली खाडीकिनाऱ्यावर मृत माशांचा खच जमा झाला आहे. ऐरोली खाडीत प्रदूषण वाढल्याने पाण्याचे तापमान वाढते आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यामुळे मासे मृत पावत असल्याचे स्थानिक मच्छीमार सांगत आहेत.

या खाडीकिनारी मृत पावलेल्या माशांमध्ये काळा मासा, जिताडा, कोळंबी, बोईस, चिंबोरी, निवट्या अशा विविध प्रकारच्या माशांचा समावेश आहे. हे मासे घणसोली, तळवली, गोठीवली, दिवा कोळीवाडा आणि ऐरोली खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात. दूषित सांडपाणी, दलदल तसेच जैविक कचरा अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगणारे हे मासे मृत्युमुखी पडत असल्याची येथील मच्छीमारांची तक्रार आहे. डासांचा नायनाट करण्यासाठी कांदळवन परिसरात फवारणी केली जाते, त्याचाही परिणाम होत असल्याचे एका मच्छीमाराने सांगितले. दरम्यान, ऐरोली खाडीमध्ये कोणत्याही कारखान्यातील रासायनिक पाणी सोडले जात नसल्याचे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपविभागीय अधिकारी सचिन हडकर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top