लाखो भाविकांच्या उपस्थितीत दख्खनच्या राजाची यात्रा साजरी

कोल्हापूर

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा आज उत्साहात पार पडली. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्येही या यात्रेला खूप महत्त्व दिले जाते. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाची तमा न बाळगता जोतिबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. वाडी रत्नागिरी येथील जोतिबाचा डोंगर भक्तांच्या अलोट गर्दीने फुलून गेला. जोतिबाच्या नावाने चांगभलंचा अखंड गजर करत चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या.

चांगभलंच्या गजराने अवघा जोतिबाचा डोंगर दुमदुमून गेला. बैलगाडी, खाजगी वाहनातून पायी चालत भाविक जोतिबा डोंगरावर आले होते. कडक उन्हातही लोक उत्साहाने पायी दर्शनासाठी आले होते. जोतिबा मंदिरात पहाटे ३ पासून धार्मिक विधी सोहळ्यास सुरुवात झाली. पहाटे ५ वाजता शासकीय महाभिषेक झाला. सकाळी १० वाजता धुपारती सोहळा झाला. दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या सासनकाठीच्या पुजनाने मिरवणुकीला सुरुवात झाली. गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण, लांबचलांब फुलाच्या माळांनी सजवलेल्या शासन काठ्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होत्या. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचत होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top