लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न घोषित स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान कधी?

नवी दिल्ली – मार्गदर्शक म्हणून बाजूला सारलेले भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना राममंदिर प्राणप्रतिष्ठेवेळी प्रारंभी डावलल्याने पसरलेली नाराजी पुसून काढण्यासाठी त्यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार आज घाईने जाहीर करण्यात आला. मात्र भाजपाची केंद्रात 10 वर्षे निर्विवाद सत्ता असूनही अजून ‘हिंदुत्ववादी’ भाजपा सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित का केले नाही, हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने आज सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्वीट करून ही माहिती दिली. दिग्गज समाजवादी नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कर्पुरी ठाकूर यांना काही दिवसांपूर्वीच मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आज अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. ही घोषणा झाल्यानंतर अडवाणी यांनी एक पत्रक जाहीर करून म्हटले की, अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने, मी ‘भारतरत्न’ स्वीकारतो. हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठीच नाही, तर ज्या आदर्श आणि तत्त्वांनुसार मी माझे जीवन व्यतीत केले आहे, त्यांचाही हा सन्मान आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या क्षमतेनुसार सेवा केली. आयुष्यात जे काम माझ्यावर सोपवण्यात आले, ते मी नि:स्वार्थीपणे पार पाडले आहे.
साठ-सत्तर वर्षे राजकारण आणि समाजकारणात सक्रिय राहिलेल्या अडवाणींची भारतीय जनता पार्टीमध्ये लोहपुरुष अशी प्रतिमा होती. 1990 च्या दशकात रथयात्रा काढून त्यांनी राम मंदिर आंदोलनाला देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते दुसर्‍या क्रमांकाचे नेते होते. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर अडवाणी यांना मार्गदर्शक मंडळात टाकून एकप्रकारे त्यांना सक्रिय राजकारणातून दूर सारण्यात आले होते. स्वतः अडवाणी यांनी त्याबद्दल अनेकदा उघड नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन भाजपाने त्यांचा उचित मान राखल्याचे सांगितले जात आहे.
अडवाणी हे अजातशत्रू राजकारणी असल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे. परंतु अडवाणींना भारतरत्न देण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अजून भारतरत्न का दिला नाही, असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला आहे.
उबाठा गटाचे नेते आनंद दुबे म्हणाले की, अडवाणी यांना भारतरत्न देण्याची बातमी ऐकून खूप आनंद होतो आहे. त्यांनी नेहमीच विनम्रतेचे राजकारण केले आणि कायम सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न कधी मिळणार? ही मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करत आहोत. भाजपा त्यांचे नाव फक्त निवडणूक येते, तेव्हाच घेते.
भाजपा सरकार सत्तेवर आल्यावर सावरकरांना भारतरत्न मिळेल, अशी आशा सावरकरप्रेमींना वाटत होती. परंतु गेली दहा वर्षे त्यांची निराशा झाली आहे. विशेष म्हणजे, सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी भाजपाच्या काही खासदारांनीही यापूर्वी केली आहे. सावरकर यांना भारतरत्न देणे, ही सन्मानाची बाब असून, त्यासाठी शिफारशींची गरज नाही, असे उत्तर गेल्या वर्षी गृहमंत्रालयाने खा. गोपाळ शेट्टी यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर दिले होते. प्रत्यक्षात भारतरत्नसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. काही दिवसांपूर्वी बिहारच्या कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाला, तेव्हाही खा. संजय राऊत यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
भाजपाला खूप उशिरा आठवण – संदीप दीक्षित, काँग्रेस नेते
अडवाणी यांना भारतरत्न मिळाल्याचा आनंद आहे. काँग्रेस आणि भाजपाला खूप उशिरा अडवाणी यांची आठवण झाली. भाजपाने आधी त्यांना जी वागणूक दिली ती दुःखद होती. आज भाजपा जी काही आहे, ती त्यांच्यामुळेच आहे. त्यांना शुभेच्छा.
भारतमातेच्या सुपुत्राचा यथोचित गौरव – एकनाथ शिंदे
अखंड भारताचे स्वप्न पाहणार्‍या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
अडवाणी हे लिव्हिंग लिजंड – देवेंद्र फडणवीस
लालकृष्ण अडवाणी यांना हा सर्वोच्च सन्मान मिळाला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ते खर्‍या अर्थाने लोहपुरूष आहेत. त्यांचा व्यासंग दांडगा आहे. राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 60-70 वर्षे राजकारणात सक्रिय राहूनही ते पूर्णपणे निष्कलंक आहेत.
उशीर झाला, पण निर्णय योग्य – शरद पवार
भारतरत्न पुरस्कारासाठी निवडलेली दोन्ही नावे योग्य आहेत. लालकृष्ण अडवाणी आणि कर्पुरी ठाकूर यांचे जीवन आणि कार्य आदर्शवत आहे. त्यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यास तसा उशिरच झाला आहे. मात्र उशिरा का होईना सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top