लोकल ट्रेनचा डबा घसरला हार्बर वाहतूक विस्कळीत

मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाजवळ आज लोकल ट्रेनचा डबा अचानक रुळावरून घसरला. यामुळे मोठा आवाज होऊन रेल्वेत बसलेल्या प्रवाशांना जोरदार झटका बसला. प्रसंगावधान राखत मोटरमनने वेळेवर ब्रेक मारला त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली.

ही लोकल पनवेलहून सीएसएमटी स्थानकावर येत होती. आज सकाळी ११.३५ च्या सुमारास ट्रेन सीएसएमटी स्थानकाजवळ पोहचली. यावेळी फलाट क्रमांक २ वर प्रवेश करत असताना अचानक लोकलचा एक डबा रुळावरून घसरला. अचानक जोरदार झटका बसल्याने प्रवासी घाबरले. या अपघाताचा परिणाम हार्बर मार्गावरील गाड्यांवर झाला. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या मस्जिद बंदर स्थानकापर्यंत थांबण्यात आल्या. हार्बर मार्गावरील सेवा वडाळ्यापर्यंत सुरू ठेवण्यात आली, तर मुख्य मार्गावरील सेवांवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान, हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही वेळातच पूर्ववत होईल, अशी हमी रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली होती. मात्र, दोन तासांहून अधिक काळ लोकल सेवा विस्कळीत असल्याने प्रवाशांचे हाल झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top