लोकसभा निवडणुकीतून ज्योती मेटे यांची माघार

बीड

शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी बीड लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. ज्योती मेटे बीडमधून लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र आज पत्रकार परिषदेतून ज्योती मेटे यांनी बीड लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगितले. लोकसभेसाठी कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार, याबाबत भूमिका लवकरच स्पष्ट करू असे देखील मेटेंनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून ज्योती मेटे बीडमधून लोकसभा निवडणूक लढणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यांनी निवडणुकीची तयारी करण्यासाठी त्यांच्या सराकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. बीडमधून उमेदवारी मिळावी यासाठी मेटेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या बीडमधून तुतारी चिन्हावर लढण्यासाठी इच्छूक होत्या. मात्र शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. त्यांनतर मेटे वंचित बहुजन आघाडीकडून अथवा अपक्ष लोकसभा लढतील, असे सांगितले जात होते.

ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषेदत सांगितले की, मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि बीडमधून निवडणूक लढवावी, अशी जनभावना होती. त्यासाठी मी माझ्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर माझी भूमीका स्पष्ट केली होती. मी उमेदवारी लढण्याचे स्पष्ट केले होते. मात्र व्यापक समाज हित लक्षात घेऊन मी बीड लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. मी बीडमधून लोकसभा निवडणुक लढवावी असा जनतेचा आग्रह होता. त्यासाठी मी उमेदवारीदेखील मागितली होती. शरद पवारांचे आणि आमचे कुठे खटकले, याबाबत मला नेमके काही सांगता येणार नाही. मी माझी उमेदवारी मिळण्यावर ठाम होते. त्यांनी त्यांच्या पातळीवर काय निर्णय घेतला, याबाबत मी बोलणे योग्य नाही. वंचितने दिलेला पर्याय आम्हाला योग्य वाटला नाही. त्यामुळे आम्ही त्यांची उमेदवारी स्विकारली नाही. लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहे. पक्ष आणि पक्षश्रेष्ठी एकत्रित येऊन निर्णय घेऊ आणि त्यानंतर आमचा निर्णय स्पष्ट करू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top