वरळी सी लिंकवर भीषण अपघात ३ जणांचा मृत्यू! ९ जण जखमी

मुंबई

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक टोलनाक्यावर काल रात्री भरधाव कारने ६ ते ७ वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ ते ९ जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी कारचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मोहम्मद सरफराज शेख (४३) असे त्याचे नाव आहे.

आरोपी सरफराज हा वांद्रे-वरळी सी लिंकवरून सुसाट गाडी चालवत होता. यादरम्यान त्याने एका मर्सिडिज कारला पाठीमागून धडक दिली. यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढत गाडी आणखी वेगात चालवली. यावेळी त्याने टोलनाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. यात दोन महिलांसह एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. खातीजा सुलेमान हाटिया, हवागोरी हनीफ पीर आणि मोहम्मद हनीफ आदम पीर अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातात आरोपी सरफराज देखील जखमी झाला. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला रुग्णालयातून डिचार्ज मिळताच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या अपघातावेळी तेथे भाजपा नेते जितेंद्र चौधरी होते. ‘या कार चालकाने मला मारण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा त्यांनी केला आहे. एका कार्यक्रमातून परतताना सी लिंकवर मागून आलेल्या कारने मी ज्या बाजुला बसलेलो त्याच बाजुला धडक दिली. मी समुद्रात पडण्यापासून वाचलो. यानंतर ही कार त्याच वेगाने टोल नाक्याच्या दिशेने गेली. टोल नाक्यावर गाड्या उभ्या असतील असा त्याला अंदाज नसावा. यामुळे त्याने तेथील गाड्यांना धडक दिली,’ असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top