वर्षभरात ५ लाख पर्यटकांनी माथेरान टॉय ट्रेनचा प्रवास केला

माथेरान- मुंबई, पुणे, ठाण्यातील नागरिकांचे सर्वात जवळचे पर्यटनस्थळ म्हणून आजही माथेरानला पहिली पसंती असते. याच माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची खास आवड असलेल्या टॉय ट्रेनला २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ५ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. या टॉय ट्रेन प्रवासातून मध्य रेल्वेची वर्षभरात ३.५४ कोटींची कमाई झाली आहे

११७ वर्षांपूर्वी सुरू झालेली नेरळ-माथेरान टॉय ट्रेन ही भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वे सेवांपैकी एक आहे. मध्य रेल्वेकडून नेरळ ते माथेरानपर्यंतच्या पर्वतरांगांना प्रदक्षिणा घालणाऱ्या अरुंद गेज मार्गावर टॉय ट्रेन सेवा चालवण्यात येते. त्यामध्ये अमन लॉज ते माथेरानदरम्यान शटल सेवेचा समावेश आहे. सध्या मध्य रेल्वे नेरळ-माथेरान-नेरळदरम्यान दररोज चार सेवा आणि अमन लॉज-माथेरान-अमन लॉजदरम्यान १६ सेवा चालविण्यात येत आहेत. त्यापैकी १२ सेवा दररोज चालतात आणि चार विशेष सेवा फक्त आठवड्याच्या शेवटी (शनिवार आणि रविवार) चालतात. २०२३-२४ या आर्थिक वर्षात माथेरानमध्ये एकूण पाच लाख प्रवासी वाहतूक करण्यात आली असून, त्यात अमन लॉज ते माथेरानदरम्यान ३.७५ लाख प्रवासी आणि नेरळ ते माथेरानदरम्यानच्या १.२५ लाख प्रवाशांचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अमन लॉज आणि माथेरानदरम्यान रु. २.४८ कोटी आणि नेरळ आणि माथेरानदरम्यान रु. १.०६ कोटींचे यासह एकूण उत्पन्न ३.५३ कोटी रुपयांचे आहे. मध्य रेल्वेने माथेरान येथे स्लीपिंग पॉड्स, ज्याला पॉड हॉटेल म्हणूनही ओळखले जाते. ते बांधण्याची तयारी केली आहे. त्यामध्ये सिंगल पॉड्स, डबल पॉड्स आणि फॅमिली पॉड्स असणार आहेत. यामुळे पर्यटकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी निवासाचे विविध पर्याय उपलब्ध असणार आहेत. या वातानुकूलित पॉड्समध्ये मोबाईल चार्जिंग सुविधा, लॉकर रूम सेवा, फायर अलार्म, इंटरकॉम सिस्टम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. पॉड हॉटेलच्या विकासाचे आणि कामकाजाचे कंत्राट ई-लिलावाद्वारे देण्यात आले आहे. पॉड हॉटेलसाठी बुकिंगचे पर्याय सुलभ असणार आहेत. पर्यटक रिसेप्शनवर आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमांतून मोबाइल ॲपद्वारे पॉड आरक्षित करू शकणार आहेत. हा उपक्रम केवळ पर्यटकांसाठी अनुभवच वाढवणारच नाही, तर पर्यटनाला चालना देऊन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून स्थानिक अर्थव्यवस्थेतही महत्त्वपूर्ण योगदान देतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top