वांग नदीवरील धरणात उतरून आंदोलन करण्याचा इशारा

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्‍यात असलेल्या महिंद गावाजवळ वांग नदीवर धरण बांधण्यात आले आहे.पण या धरणात पाणी कमी आणि गाळ जास्त अशी स्थिती आहे. याबाबत शासकीय यंत्रणेने तातडीने निर्णय घ्यावा,अन्यथा १ जानेवारीपासून या धरणात उतरून आंदोलन छेडले जाईल,असा इशारा महिंद गावचे तरुण कार्यकर्ते राहुल शेडगे यांनी दिला आहे.

याबाबत राहुल शेडगे यांनी सांगितले की,या महिंद धरणाची घळभरणी २३ वर्षांपूर्वी झाली आहे. ८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणार्‍या या धरणाचे पाणलोट क्षेत्र ३५.९८ चौरस किलोमीटरचे आहे.वांग नदीसह अनेक ओढ्याची पात्रे या धरणाला मिळत असल्याने पावसाच्या पहिल्या आठवड्यातच धरण ओसंडून जात होते.यावेळी ओढ्याच्या पाण्याबरोबर येणारा गाळ धरणात बसतो. उन्हाळ्यात पाणीसाठा कमी झाला की हे गाळाचे ढिगारे उघड्यावर येतात.दरवर्षी हा गाळ उपसणे गरजेचे आहे. पण प्रशासनाकडून तसे झालेले नाही.गाळाबरोबर जलपर्णीनेही या धरणात येतात.त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास १ जानेवारीला धरणाच्या जलाशयात उतरून आंदोलन केले जाणार आहे.जोपर्यंत गाळ निघत नाही,मी धरणाबाहेर येणार नाही,असा इशारा शेडगे यांनी प्रशासनाला दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top