वाराणसीत २५ क्विंटल गुलाबाच्या पाकळ्यांनी मोदींचे स्वागत होणार

वाराणसी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ डिसेंबर रोजी आपला लोकसभा मतदारसंघ काशीचा दौरा करणार आहेत. यावेळी सुमारे २० किलोमीटर लांबीचा रोड शो नियोजित आहे. रोड शो दरम्यानवेळी भाजपा कार्यकर्ते ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करणार आहेत, यासाठी २५ क्विंटल गुलाबाच्या पाकळ्या मागवण्यात आल्या आहेत. नमो घाटावर आयोजित काशी तमिळ संगमच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

१७ आणि १८ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीमध्ये जवळपास २५ तास असणार आहेत. पहिल्या दिवशी १७ डिसेंबर रोजी रोड शो होणार आहे. यासोबतच भारत संकल्प यात्रा प्रदर्शनालाही भेट देणार आहेत. यानंतर मोदी लोकांशी संवाद साधतील आणि अभिप्राय घेतील. काशी-तमिळ संगमच्या उद्घाटन सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. १८ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करणार आहेत. यानंतर स्वर्वेद मंदिराच्या उद्घाटनासाठी येणार आहेत.

वाराणसीतील विश्वनाथ धामच्या लोकार्पणाला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त येथे विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण धाम दिव्यांनी उजळून निघाला होता. काही ठिकाणी दिव्यांची सजावट मंदिरांमध्ये वेगळेच वातावरण निर्माण करत होती. गंगेच्या काठापासून संपूर्ण मंदिर चौक आणि त्यानंतर मंदिर परिसर भव्य पद्धतीने सजवण्यात आला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top