विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

पुणे

पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील देवजाळी मळ्यातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढले. देवजाळी येथील विहिरीत आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पडला. ही घटना विहिरीजवळ राहत असलेल्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वन क्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी घटनास्थळी रेस्क्यू टीम पाठवून बिबट्याला बाहेर काढले. यानंतर बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात नेले.

विहिरीतून बाहेर काढलेला बिबट्या मादी असून तिचे वय सहा वर्षाचे आहे. गेल्या आठवडाभरात देवजाळी परिसरात ३ ते ४ बिबटे आढळले. या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, या विहिरीजवळ मजूर कुटुंब राहत असून त्यांच्याजवळ कोंबड्या व पाळीव कुत्रे आहे. शिकारीच्या आशेने बिबट्या दररोज येथे येतो. या कुटूंबात लहान मुले आहेत. बिबट्या या लहान मुलांवर हल्ला करून काही धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top