वीस वर्षांत आयआयटीतील ११५ विद्यार्थ्यांची आत्महत्या

नवी दिल्ली – देशात तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण देणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीमध्ये गेल्या २० वर्षात तब्बल ११५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आणि ग्लोबल आयआयटी अॅल्युमिनी सपोर्ट ग्रुपचे संस्थापक धीरज सिंह यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नातून ही माहिती मिळाली आहे. यातील ९८ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना या आयआयटी महाविद्यालय परिसरात घडल्या असल्याची माहिती आहे. ९८ पैकी ५६ मृत्यू हे गळफास घेऊन झाले आहे. तर १७ जणांनी महाविद्यालय परिसराबाहेर आत्महत्या केली.
२००५ ते २०२४ या कालावधीत आयआयटी, मद्रासमध्ये सर्वाधिक २६ आत्महत्यांच्या घटना घडल्या आहे. तर आयआयटी कानपूरमध्ये १८, आयआयटी खरगपूरमध्ये १३ आणि आयआयटी मुंबईमध्ये १० जणांनी आत्महत्या केली आहे. चालू वर्षात आतापर्यंत ५ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
१२ फेब्रुवारी २०२३ रोजी आयआयटी मुंबईचा विद्यार्थी दर्शन सोळंकी याने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर धीरज सिंह यांनी उच्च शिक्षण विभागाकडे माहितीच्या अधिकारातून अर्ज दाखल करून गेल्या २० वर्षांत देशभरातील आयआयटीतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची आकडेवारी मागितली होती. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाने सुरुवातीला धीरज सिंह यांचा अर्ज फेटाळून लावला होता. प्रत्येक संस्थेसाठी स्वतंत्र आरटीआय अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. या आवाहनानंतर मंत्रालयाने सर्व आयआयटींना डेटा शेअर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top