शरद पवारच सत्तेत जायचे असे म्हणाले! अजित पवारांचा गौप्यस्फोट राजीनामा दिला आणि मग स्वतःच आंदोलने घडवून आणली

कर्जत – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिराच्या आजच्या अखेरच्या दिवशी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ या तिघा बड्या नेत्यांनी स्पष्टपणे आणि पुन्हा पुन्हा सांगितले की, शरद पवार यांना भाजपशी युती करायची होती. त्यांनीच आम्हाला सत्तेत जाण्यास सांगितले आणि मग कोणतेही कारण न देता त्यांनी भूमिका बदलली. अजित पवारांनी असेही सांगितले की, राजीनामा देणार असे सांगून शरद पवारांनी राजीनामा दिला आणि मग तोही निर्णय फिरवला. त्यासाठी आंदोलन करायला कार्यकर्ते आणा, असे शरद पवारांनीच आव्हाड आणि परांजपे यांना सांगितले. या गौप्यस्फोटामुळे खळबळ माजली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कर्जतमधील दोन दिवसीय शिबिराचा समारोप आज अजित पवार यांच्या भाषणाने झाला. या दीर्घ भाषणात अजित पवार पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवारांविरोधात थेट आणि खूप काही बोलले. ते म्हणाले, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक-निंबाळकर, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे आम्ही 10-12 जण देवगिरीवर बसलो होतो. भाजपसोबत जाण्याबाबत थेट शरद पवारांना सांगितले तर त्यांना काय वाटेल, या विचाराने मी ताईला (सुप्रिया सुळे) बोलावले आणि सांगितले की, सर्व जिवाभावाचे सहकारी आहेत. लोकशाहीत बहुमताचा आदर करावा लागतो, तरच संघटना पुढे जाते. ती म्हणाली, मला सात-आठ दिवस द्या. मी साहेबांना समजावते. काय करायचे ते माझ्यावर सोपवा. आम्ही थांबलो. पुन्हा आम्ही एकत्र बसलो. अनिल देशमुख, जयंत पाटील होते. सरकारमध्ये गेले पाहिजे. आमदारांच्या कामांना स्थगिती मिळाली आहे. अनेक प्रश्‍न आहेत. बहुजन समाज आणि अल्पसंख्याकांचा विचार झाला पाहिजे. याचा विचार यावेळी आम्ही केला. शरद पवार यांना आम्ही सर्व सांगितले. त्यांनी सर्व ऐकले आणि बघू असे म्हटले. वेळ जात होता. एकदा काय तो निर्णय घ्यायचा तो घ्या असे आम्ही त्यांना सातत्याने
सांगत होतो.
त्यानंतर त्यांनी मला सांगितले की, 1 मेच्या आधी तुम्ही सरकारमध्ये जा, मी राजीनामा देतो. घरातल्या चौघांनाच शरद पवार राजीनामा देणार हे माहीत होते. त्यानंतर त्यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळी राजीनामा दिला. सर्वांना धक्का बसला. वेगळे वातावरण तयार केले, पण मग जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांना बोलावून घेतले आणि सांगितले की, उद्यापासून यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर काही कार्यकर्ते बोलवा आणि आंदोलनाला बसवा आणि राजीनामा मागे घेण्याची मागणी करा. तिथे जितेंद्र सोडला तर एकही आमदार नव्हता. राजीनामा मागेच घ्यायचा होता तर दिला कशाला?
अजित पवार पुढे म्हणाले की, शरद पवारांनी धरसोड वृत्तीने आम्हाला गाफील ठेवले. 2 जुलैला आम्ही शपथ घेतली. 30 जूनला कार्यकारिणी झाली होती. त्यात सगळे होते. 2 जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता तर मग 17 जुलैला आम्हा सर्व मंत्र्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला चर्चेला का बोलावले? आधी मंत्र्यांना बोलावले, नंतर आमदारांना बोलावले. आमदार घाबरत असताना मी सर्वांना नेले. चहापाणी झाले. तिसर्‍या दिवशी उर्वरित 7-8 जणांशी चर्चा केली. सर्व सुरळीत होणार. सर्व ट्रॅकवर आहे. सर्व पूर्ववत करायचे, असे निरोप यायचे. त्यानंतर 12 ऑगस्टला मला एका उद्योगपतीने पुण्याला जेवायला बोलावले. तिथे मला सांगितले की वरिष्ठांशी चर्चा झाली. तिथे जयंत पाटील येतील, तुम्ही असाल आणि मी असेन, असा निरोप दिला. दुपारी जेवायचे ठरले. निरोप आल्यानंतर मी गेलो. जुलै गेला, ऑगस्ट गेला. दीड महिना उलटून गेला. तुम्हाला करायचे नव्हते तर गाफील कशाला ठेवायचे? आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच लोकांची कामे करत आहोत. जागा वाटपासंदर्भात तुम्ही काळजी करू नका, सगळ्यांना न्याय मिळेल. माझ्यासकट नऊ मंत्र्यांनी चार-चार जिल्हे वाटून जबाबदारी घेतली आहे. जो काम करतो, तोच चुकतो. जो तोंडच उघडत नाही तो काय बोलणार. मी हे बोललोच नाही, मी हे ऐकलेच नाही असे मी बोलत नाही.
अजित पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटील माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, शरद पवारांना भाजपबरोबर जायचे असते तर ते यापूर्वीच गेले असते. ते भाजपसोबत गेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्याचे दु:ख कोणाला असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. चिंतन शिबिरात चिंतन करायचे असते.

बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार देणार
बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चारही लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी लढवणार. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गट ज्या जागांवर निवडणूक लढवणार आहे, त्या जागांवर जिथे राष्ट्रवादीची ताकद असेल तिथेही उमेदवार उभा करणार असे जाहीर करीत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी लोकसभा प्रचाराचे रणशिंग फुंकले. अजित पवार म्हणाले, इतर जागांसंदर्भात आपण शिंदे, फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. जागावाटपासंदर्भात या सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार आहोत.

जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे
अजित पवारांची आरक्षणावर भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या दोन दिवसीय चिंतन शिबिरात समारोपाचे भाषण करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आरक्षणबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी मनोज जरांगे यांचेही कान टोचताना छगन भुजबळ यांची भूमिकाच पुढे नेली. अजित पवार म्हणाले की, राज्यात गेल्या काही महिन्यांत मराठा आरक्षणावरून जोरदार चर्चा होत आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी ठराव करून मराठा समाजास आरक्षण देण्याची भूमिका जाहीर केली आहे. परंतु त्यानंतर छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे-पाटील असा संघर्ष उभा राहिला आहे. जातीचा अभिमान जरूर जपा, पण इतर जातीसंदर्भात द्वेष मनात ठेऊ नका. एखाद्या समाजाचा प्रश्‍न सोडवत असताना इतरांवर अन्याय होणार नाही, याची काळजी आपणास घ्यावी लागणार आहे. एखादा समाजाचे मागासलेपण काळानुसार झाले असेल तर ते तपासण्यासाठी वेळ लागतो, हे लक्षात घ्या. मराठा समाजातील आरक्षण देताना इम्पीरिकल डाटा महत्त्वाचा आहे. त्याशिवाय आरक्षण टिकत नाही. यापूर्वी
सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. सध्या जाती-जातीत भांडणे उभी राहिली आहे, हे दुर्दैवी आहे. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. पण आज महाराष्ट्रात काय सुरू आहे? त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र हाच आहे का? अवघ्या देशात पहिले आरक्षण महाराष्ट्रात लागू झाले. अहिल्याबाई होळकर यांनी देशात अनेक कामे केली, पण त्या लोकांनी कधी जात पाहिली नाही. कुणबी हे शेती करणारे आहेत. आपले पोर शिकले पाहिजे हे प्रत्येक आई-बापाचे स्वप्न असते. परंतु इतरांचे पोर शिकू नये, असे नको. आज राज्यात चिथावणी करणारी भाषणे होत आहेत. हे थांबले पाहिजे. यातून दंगली घडल्या तर कोण जबाबदार?

अजित पवार यांना
विश्‍वविक्रमी पुष्पगुच्छ

इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर अँड रेकॉर्ड्स लंडन यांच्या मान्यतेने 180 विश्‍वविक्रम करणारे एक भारतीय डॉ. दीपक हरके यांच्या वतीने कर्जत येथील रॅडिसन ब्लू रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी शिबिरात अजित पवार यांचा 1369 गुलाबांच्या फुलांचा विश्‍वविक्रमी गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर अँड रेकॉर्ड्स लंडनमध्ये करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के-पाटील व नगरचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रयत्नातून हा विश्‍वविक्रमी गुच्छ देण्यात आला. इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर अँड रेकॉर्ड्स लंडनचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकूल हे पुढील आठवड्यात लंडनहून मुंबईत येऊन या विश्‍वविक्रमाचे प्रमाणपत्र अजित पवारांना देणार आहेत. नगरच्या शुभ फ्लॉवर्स अँड डेकोरेटर्सने हा विश्‍व विक्रमी गुच्छ बनविला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top