शरद पवारांच्या नेतृत्वाखाली उद्या कांदाउत्पादक शेतकर्‍यांचे आंदोलन

चांदवड – केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातमूल्यामध्ये वाढ केल्यानंतर आता कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतापले आहेत. या शेतकर्‍यांनी आता उद्या सोमवार ११ रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून चांदवड येथील चौफुलीवर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्य महिला आयोगाच्या सदस्या तथा माजी आमदार दीपिका चव्हाण,माजी आमदार संजय चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी केले.यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तालुकाध्यक्ष मांडवडे म्हणाले की,कांद्याचे दर पाडण्यासाठी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क, नंतर किमान निर्यात मूल्यात प्रचंडवाढ असे तुघलकी शेतकरीविरोधी निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारने आता कांदा निर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत सरसकट बंदी घातली आहे.हे अन्यायकारक आहे.एकीकडे अवकाळी पाऊस,गारपिटीच्या अस्मानी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत असताना केंद्र शासन मात्र बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top