शिंदेंच्या बंडानंतर उध्दव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली! देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मुंबई- एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. तुम्ही मुख्यमंत्री बना, असे म्हणत त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एका मुलाखतीदरम्यान फडणवीस यांनी हा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या दाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.
फडणवीस यांनी सांगितले की, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. तुम्ही मुख्यमंत्री बना, असे म्हणत त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. मात्र वेळ निघून गेली होती. आम्ही एकनाथ शिंदेसोबत एकत्र येत आहोत हे चित्र जेव्हा स्पष्ट झाले. त्यादिवशी सकाळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. २०२२ सालच्या सत्ता स्थापनेच्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री बना असे त्यांनी मला सांगितले. तुम्ही कशाला त्यांना सोबत घेता किंवा त्यांना एखादे पद देता? मी संपूर्ण पक्षच घेऊन येतो. तुम्ही मुख्यमंत्री बना आपण हे सगळे नीट करू, असे ठाकरे म्हणत होते. मिलिंद नार्वेकरांनी मला फोन लावला, मग उद्धव ठाकरे बोलले. पण मी उद्धव ठाकरेंना सांगितले वेळ निघून गेली आहे. या निर्णयासाठी वरिष्ठांशी बोला, असा सल्ला मी त्यांना दिला. माझ्या पातळीवर हा निर्णय संपल्याचे मी ठाकरेंना सांगितले. जे सोबत आले त्यांच्याशी बेईमानी करणार नाही, असेही मी त्यांना स्पष्ट सांगितले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या दाव्याला शिंदेंनीदेखील दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात सत्यता आहे. आम्ही बाहेर गेलो तेव्हा ठाकरेंनी प्रयत्न केले. आम्हाला फोन आले. तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो. तुम्ही पुन्हा या. मात्र मी मुख्यमंत्री बनण्यासाठी हा निर्णय घेतला नव्हता. ज्यावेळी बाळासाहेबांच्या विचारांची फारकत घेतली गेली, त्यावेळी वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो होतो. मलाही निरोप दिला होता. दिल्लीलादेखील त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की, यांना कशाला घेता आम्हीच येतो, अख्खी शिवसेना तुमच्यासोबत येईल. मात्र तोपर्यंत त्यांच्याकडे शिवसेना राहिलीच नव्हती. ५० लोक माझ्यासोबत होते. त्यामुळे देवेंद्र फडवीस सांगत आहेत त्यात वस्तूस्थिती आहे. आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत. मात्र त्या मी बोलू इच्छित नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top