शिंदेंच्या विमानातून शिर्डीत’वेगळे’ प्रचार साहित्य पोहोचले संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ

मुंबई – शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीवर नवी तोफ डागली. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासगी विमानाने शिर्डी मतदारसंघात गेले होते. मात्र प्रचारात ते कुठेच दिसले नाहीत. त्यांच्या खास विमानातून बरेच सामान निघाले अशी चर्चा होती . ‘वेगळ्या प्रकार’चे प्रचार साहित्य शिर्डीत पोहोचविण्यात आले, असा आरोप संजय राऊत यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या विमानातून शिर्डीत मतदारांना वाटण्यासाठी रोकड नेण्यात आली असा राऊत यांच्या म्हणण्याचा रोख होता.
राऊत यांच्या या आरोपामुळे अशी चर्चा सुरू झाली आहे की, मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दौरा करतात. काल मुख्यमंत्री शिंदे खास विमानाने शिर्डीत गेले. मात्र त्यांनी तिथे कोणतीच प्रचार सभा घेतली नाही. मग ते शिर्डीत नेमके का आले होते?
राऊत यांनी आरोप करताना असाही सवाल केला की, शिंदे यांचा शिर्डी दौरा आणि तिथे जे काही त्यांनी केले त्याची निवडणूक आयोगाला काहीच माहिती कशी नाही? निवडणूक आयोग झोपला होता का, असा सवालही राऊत यांनी विचारला. संजय राऊत यांच्या या आरोपाला शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत हेच शिर्डीमध्ये वसुली करण्यासाठी गेले असतील. त्यांना जर मुख्यमंत्री शिंदे यांच्या विमानात काय आहे हे माहीत होते तर मग त्यांनी आयोगाकडे त्याचवेळी तक्रार का केली नाही, असा प्रतिसवाल शिरसाट यांनी केला. केवळ स्वतःचा टीआरपी वाढविण्यासाठी राऊत अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करतात, असे शिरसाट म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top