शिंदेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राजेंद्र गावितांचा भाजपात प्रवेश

मुंबई

पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. शिंदेंना भक्कम साथ देऊनही पालघरमधून तिकीट कापल्याने गावित नाराज असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. ऐन लोकसभा निवडणुकीत गावित स्वगृही म्हणजे भाजपामध्ये गेल्याने तसेच शिंदे गटाचा पहिला खासदार फुटल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार, खासदारांना मोठा धक्का बसला आहे.

याप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदेंना आम्ही म्हणालो २०१९ मध्ये गावितांना तुम्हाला दिले होते, आता नवीन परिस्थितीत त्यांना पुन्हा भाजपात घ्यायचे आहे. या गोष्टीला मुख्यमंत्र्यांनीही संमती दिली. त्यानुसार आज गावितांचा पुनर्प्रवेश झाला. आता २०२४ साली पालघर मतदारसंघाची जागा शिवेसनेला मिळाली. गावितांबरोबर चर्चा झाली आणि पक्षाने निर्णय घेतला की त्यांचा उपयोग महाराष्ट्रात अधिक आहे. मंत्रीपदाचा अनुभव असल्याने त्यांचा फायदा महाराष्ट्राला अधिक करून घेता येईल. खासदार म्हणून त्यांनी चांगले काम केले असले तरीही महाराष्ट्रात त्यांना अधिक स्कोप आहे. कारण, महाराष्ट्रात त्यांचा चांगला संपर्क आहे. मंत्री राहिल्याने सरकारशी कनेक्ट आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या संमतीनेच उमेदवार बदलून डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top