शिंदेंना हटवण्याच्या प्रस्तावावर बनावट सह्या! लांडेंचा दावा

नागपूर – आमदार अपात्रता सुनावणीत आज ठाकरे गटाच्या वतीने 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीची अटेंडंट शीट सादर करण्यात आली. यावर शिंदे गटाच्या 23 आमदारांच्या सह्या आहेत. एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याबाबतच्या प्रस्तावाला या आमदारांनी अनुमोदन दिल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. मात्र या ठरावावर माझी स्वाक्षरी नाही, जी आहे ती बनावट स्वाक्षरी आहे, असा दावा आमदार दिलीप लांडेंनी केला. लांडेंच्या साक्षीनंतर दुसर्‍या सत्रात योगेश कदम यांची साक्ष सुरू झाली.
शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी आज दुसर्‍या दिवशीही विधिमंडळात सुरू होती. कालपासून सुरू झालेली शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष आज संपली. ठाकरे गटाचे वकील अ‍ॅड. देवदत्त कामत यांनी त्यांना 116 प्रश्न विचारले. दिलीप लांडेंच्या उलट तपासणी दरम्यान ठाकरे गटाच्या वकीलांनी एक अटेंडंट शीट सादर केली. ही अटेंडट शीट 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीची होती. या अटेंडंट शीटवर, शिंदे गटातील 23 आमदारांच्या सह्या आहेत. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून हटवण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता, ज्याला या आमदारांनी अनुमोदन दिले होते. मात्र सुनावणीत आमदार दिलीप लांडे यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याच्या ठरावावर आपली स्वाक्षरी नसल्याचा दावा आमदार लांडे यांनी केला. ते म्हणाले की, विधिमंडळ सदस्यांच्या सह्या यादीवर घेतलेल्या असतात. आमची यादी बनवली व सह्या घेतल्या. बैठकीच्या उपस्थितीनंतर पेनाने लिहिलेले आहे. मला यातून निदर्शनास आणून द्यायचे आहे की विधानसभा सदस्यांच्या सह्या यादीवर आधी घेण्यात आल्या. आजच्या सुनावणीत आमदार दिलीप लांडे यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचे वकील अ‍ॅड. देवदत्त कामत यांनी केला. ज्या ईमेलवर व्हिप बजावला त्या मेलबाबत विचारणा केली असता तो मेल माझ्या मतपेढीचा आहे. मी मुंबईत नव्हतो, त्यामुळे मेल मिळाला नाही, असे लांडे म्हणाले. मग भरत गोगावले यांचा 4 जुलै 2022 चा कथित पक्षादेश कसा मिळाला असा प्रश्न कामत यांनी विचारला. त्यावर तो मला त्यांनी माझ्या हातात दिला असे उत्तर लांडे यांनी दिले. सुरत आणि गुवाहाटी दौर्‍याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ती माझी खासगी माहिती आहे, मी कुठेही फिरू शकतो, असे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, आमदार दिलीप लांडे आज सुनावणीसाठी 20 मिनिट उशिरा आले. ठाकरे गट वकील अ‍ॅड. देवदत्त कामतांच्या विनंती नंतर साक्षीदाराने केलेला हा उशीर विधानसभा अध्यक्षांनी रेकॉर्डवर आणला. आमदार योगेश कदम यांनीही उलटतपासणीवेळी आपणाला सुनील प्रभू यांचा कोणताही व्हिप मिळाला नसल्याचे सांगितले. कदम यांनाही 21 जूनच्या बैठकीच्या उपस्थितीबाबत वकील कामत यांनी प्रश्न विचारला.21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक झाली का असे विचारता अशी कोणतीही बैठक झाली नाही नाही. वर्षावरील बैठकीचा व्हिप सुनील प्रभूंकडून मिळाला नाही, पोचपावतीवर मी सही केलेली नाही, असे कदम म्हणाले. त्यानंतर कामत यांनी योगेश कदम यांनी स्वाक्षरी केलेल्या पोचपावतीची मूळ प्रत अध्यक्षांसमोर सादर केली. त्यावर ही माझ्या सहीसारखी दिसत आहे, पण ही सही केल्याचे मला आठवत नाही, असे उत्तर कदम यांनी दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top