शिर्डीत येऊन मोदींनी पवारांना फटकारले! 7 वर्षे केंद्रात मंत्री! शेतकऱ्यांसाठी काय केले?

नगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात दाखल झाले. यावेळी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर टिकेची झोड न उठवता त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंचावर बसले होते. त्यांच्यासमोरच नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता सात वर्षे केंद्रात मंत्री होता तेव्हा त्याने शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल केला. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सिंचन खाते हे अजित पवारांकडे अनेक वर्षे होते. त्याबद्दल मात्र नरेंद्र मोदी काहीही बोलले नाहीत. त्याचबरोबर मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी अवाक्षर उच्चारले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आले होते. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन ते शेतकऱ्यांच्या सभेत हजर झाले. यावेळी मंचावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची वारेमाप स्तुती केली. त्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या छोटेखानी भाषणात केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि गरिबांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. शरद पवार हे वैयक्तिकरित्या वंदनीय आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता केंद्रात कृषीमंत्री होता. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? मंत्रिपदाच्या सात वर्षांत त्यांनी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीनुसार साडेतीन लाख कोटी रुपयांचा शेतमाल खरेदी केला. आमचे सरकार आल्यानंतर तितक्याच सात वर्षांत आम्ही साडेतेरा लाख कोटी रुपयांचा शेतमाल किमान आधारभूत किमतीत खरेदी करून शेतकऱ्यांना मदत केली. हे आकडे तुम्ही लक्षात ठेवा. त्यांच्या काळात शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी दलालांपुढे हात जोडावे लागत होते. त्यांच्या पुढे-मागे करावे लागत होते. आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाची किंमत थेट त्यांच्या खात्यात पोहोच केली.
आम्ही चणे आणि ऊस यांची किमान आधारभूत किंमत वाढविली. इथेनॉल अधिक प्रमाणात खरेदी केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींचा लाभ झाला. छोट्या शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्यासाठी योजना करत आहोत. मुंबई शिर्डीसारख्या अनेक वंदे भारत ट्रेन सुरू केल्या आहेत. सबका साथ सबका विकास हा आमचा मंत्र आहे.
गरिबांचे कल्याण करण्यासाठी आमचे सरकार काम करत आहे. आतापर्यंत 1 कोटी 10 लाख नागरिकांनी आयुष्यमान कार्ड अंतर्गत मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे. गरिबांना मोफत रेशन आणि घर देण्यासाठी 4 लाख कोटी रुपयांचा खर्च केला आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सुतार आणि इतर व्यावसायिकांना मदत करण्यात आली. मी लाखो कोट्यवधी रुपयांचे आकडे सांगत आहे. हेच आकडे आपण ऐकले असतील पण ते भ्रष्टाचाराचे होते. आधीच्या सरकारने एवढ्या रक्कमांचे घोटाळे केले. त्यांनी फक्त घोटाळे केले आहे. पण आम्ही विकास करतो आहोत.
बस रिकाम्या परत पाठवल्या
मोदी यांच्या सभेसाठी भाजपने जोरदार तयारी केली होती. यासाठी गावागावातून एसटी बसेस ग्रामस्थांना एसटी सभेच्या ठिकाणी सोडल्या जाणार होत्या. परंतु नगर जिह्यातील शेवगाव तालुक्यातील मठाची वाडी येथील गावकऱ्यांनी मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून बस रिकाम्याच पाठवल्या. तर मंगरुळ येथे गेलेल्या एसटी बसच्या काचा अज्ञातांनी फोडल्या. यामुळे ही बस चालकाने पुन्हा शेवगाव आगारात पुन्हा आणली. पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top