शिवसेना-समाजवादी दुरावा संपला! पुन्हा एकत्र

मुंबई – शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर शिवसेनेला पुन्हा बळकट करण्यासाठी गेली अनेक दशके समाजवादी आणि धर्मनिरपेक्षवादी विचारांच्या पक्षांपासून अंतर राखून ठेवणारी उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा समाजवादी पक्ष आणि संघटनांसोबत राजकीय वाटचाल करणार आहे. येत्या रविवारी 15 ऑक्टोबर रोजी राज्यातील समाजवादी जनता परिवारातील सर्व पक्ष आणि संघटना यांच्यासोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार असून, या बैठकीत समाजवादी-शिवसेना(उबाठा) यांच्या युतीवर शिक्कामोर्तब केले जाईल.
रविवारच्या समाजवादी परिवाराच्या बैठकीला निवडक दीडशे जणांना निमंत्रित करण्यात आले आहे. यात ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांचा समावेश आहे. कामगार नेते शशांक राव, असिम राव, जार्ज फर्नांडिस यांचे सहकारी सुभाष मळगी, जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष निहाल अहमद यांच्या कन्या शान यांची विशेष उपस्थिती या बैठकीला असेल.
शिवसेनेने स्थापनेपासून आजवर 22 वेळा धर्मनिरपेक्षवादी (सेक्युलर) पक्षांसोबत युती केली आहे. जॉर्ज फर्नांडिस यांच्या पक्षासोबत शिवसेनेने केलेली युती अजूनही मुंबईकरांच्या स्मरणात आहे. बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत आता उद्धव ठाकरेही वाटचाल करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी युक्रांदच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. आता समाजवादी जनता परिवारातील दिग्गजांशी ते रविवारी एमआयजी क्लब येथे संवाद साधून युती भक्कम करणार आहेत.
या बैठकीबाबत बोलताना जनता दल (युनायटेड)चे राष्ट्रीय सरचिटणीस कपिल पाटील म्हणाले, पुण्यात समाजवादी विचार मानणार्‍या जनता परिवारातील पक्षांची आणि संघटनांची एक बैठक 24 ऑगस्ट रोजी पुण्यात झाली होती. या बैठकीनंतर ही दुसरी बैठक मुंबईत घेण्यात येत असून, या बैठकीलाही समाजवादी परिवारातील सर्व पक्ष, संघटना एकत्र येत आहेत. या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा निमंत्रितांशी संवाद साधणार आहेत. इंडिया आघाडीत समाजवादी विचारांचे पक्ष आणि ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र आहेत. आता महाराष्ट्रातही भविष्यात एकत्र राहून निवडणुका लढण्यावर जवळपास एकमत झाले आहे. समाजवादी जनता परिवारातील पक्ष, आमच्या विविध संघटनांकडे राज्यातील किमान 7 ते 8 टक्के मते आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीसोबतच राज्यातील भाजप-महायुतीविरोधी आघाडी राजकीयदृष्ट्या भक्कम होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top