शेअर बाजारात घोटाळा सुरू आहे! हर्ष गोयंकांच्या वक्तव्याने खळबळ

कोलकाता- शेअर बाजारात मोठा घोटाळा सुरू असून, शेअर बाजारात घोटाळे करणारे बिग बिल हर्षद मेहता आणि केतन पारेख यांचा काळ परत येतो आहे. याचा फटका छोट्या गुंतवणूकदारांना बसणार आहे, असे सनसनाटी वक्तव्य ज्येष्ठ उद्योगपती आणि आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्षवर्धन उर्फ हर्ष गोयंका यांनी केला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात शेअर बाजारात तेजी होत आश्चर्यजनक घडामोडी घडत असताना त्यांचे हे वक्तव्य आल्याने खळबळ माजली आहे. गोयंका यांनी अर्थ मंत्रालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
हर्ष गोयंका सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा सर्वांना ज्ञात आहे. त्यांनी काल एक्स अकाऊंटवर पोस्ट करत लिहिले की, सध्या शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसत आहे. याचा फायदा घेण्यासाठी हर्षद मेहता आणि केतन पारेख यांच्या काळात जसे गैरप्रकार होत होते तसे पुन्हा सुरू झाले आहेत. खासकरून कोलकाता येथे हे प्रकार घडत असून, कंपन्यांचे प्रवर्तक प्रॉफिट एंट्रीच्या माध्यमातून आपल्या नफ्यात वाढ करत आहेत. गुजराती आणि मारवाडी दलालांशी हातमिळवणी करून शेअरच्या किमती अवास्तव वाढवण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे छोट्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ शकते. ते होण्यापूर्वीच सेबी आणि अर्थ मंत्रालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून चौकशी करण्याची मागणी गोयंका यांनी केली आहे. त्यांनी ही पोस्ट सेबी आणि अर्थ मंत्रालयाला टॅगही केली आहे.
गेल्या वर्षी गौतम अदानींच्या अदानी समूहावर शेअरच्या किमतीत गैरप्रकार वाढवल्याचा आरोप हिंडेनबर्गच्या अहवालात करण्यात आला होता. या आरोपाची सेबीने चौकशी केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले होते. सेबीने हिंडेनबर्गचा अहवाल ‘पूर्ण सत्य’ असल्याचे मान्य केले नव्हते. परंतु या अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये या काळात मोठी घसरण झाली होती. आता शेअर बाजार पुन्हा तेजीत आला आहे. त्यात हर्ष गोयंका यांनी केलेल्या आरोपांनंतर खळबळ माजली असून सोमवारी शेअर बाजारात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
हर्षवर्धन गोयंका कोण आहेत?
हर्षवर्धन गोएंका हे 1988 पासून आरपीजी समूहाचे अध्यक्ष असून या ग्रुपमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 15 कंपन्यांचा समावेश आहे. या समूहाची उलाढाल अंदाजे 4.7 अब्ज डॉलर इतकी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top