शेफ विष्णू मनोहर तयार करणार 7000 किलो ‘राम हलवा’

नागपूर – अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य अभिषेक सोहळ्याची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी नागपूरचे शेफ, विष्णू मनोहर 7000 किलो ‘राम हलवा’ तयार करणार आहेत. विष्णू मनोहर यांनी 12 हजार लिटर क्षमतेची खास कढई बनवली असून त्यात ते राममंदिर परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राम हलवा तयार करणार आहेत.
शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले की, या कढईचे वजन 1300 ते 1400 किलो आहे. ही कढई स्टीलची असून तिचा मध्यवर्ती भाग लोखंडाचा बनलेला आहे. जेणेकरून हलवा बनवताना तो जळू नये. या कढईचा आकार 10 फूट बाय 10 आहे. याची क्षमता 12,000 लीटर असून, त्यात 7,000 किलो हलवा बनवता येतो. तो उचलण्यासाठी क्रेनची आवश्यकता असते. 900 किलो रवा, 1000 किलो तूप, 1000 किलो साखर, 2000 लिटर दूध, 2500 लिटर पाणी, 300 किलो सुका मेवा आणि 75 किलो वेलची पावडर वापरून हा हलवा तयार केला जाणार आहे.
रामलल्लाला अर्पण केल्यानंतर हा प्रसाद सुमारे दीड लाख लोकांना वाटला जाणार आहे. विष्णू मनोहर यांनी सांगितले की, आम्ही या उपक्रमाला ‘कार सेवा ते पाक सेवा’ असे नाव दिले आहे. त्याच्याशी आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. आंदोलनादरम्यानची अयोध्या आणि आजची अयोध्या यात खूप फरक आहे. आज अयोध्येत खूप जल्लोष आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top