श्रीराम आता तंबूत राहणार नाहीत कालचक्र शुभ दिशेने जाईल

अयोध्या – आज अत्यंत पवित्र, मंत्रमुग्ध आणि प्रचंड उत्साहात देश-विदेशातील भक्तांच्या साक्षीने अयोध्या जन्मभूमीवरील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली! प्रभू श्रीराम विराजमान झाले! यावेळी मनोदय सादर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यापुढे श्रीराम तंबूत राहणार नाहीत. कालचक्र आता शुभ दिशेने प्रवास करील. रामसमर्पण ते राष्ट्रसमर्पण हे ध्येय ठेवून आपण सर्वांनी भव्यदिव्य भारताच्या निर्माणाची शपथ घेऊ.
अयोध्येत सकाळपासूनच शुभ क्षणाची लगबग होती. अवघी नगरी फुलांनी सजली होती. अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती अयोध्येत पोहोचत होत्या. त्यांच्या गाड्या भराभर दाखल होत होत्या. त्यांच्या भोवती कॅमेरे फिरत होते. मंदिरात आजच्या दिवसाचे विधी सुरू होते. सकाळचे शीतल वातावरण भजन कीर्तनाच्या निनादात प्रसन्न झाले होते. पारंपारिक भारतीय पोषाख घालून माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, कंगना रनौट, अनुपम खेर, रणबीर, आलिया, विकी कौशल, कतरिना कैफ, राम चरन, सचिन तेंडुलकर, तेलगू सुपरस्टार चिरंजीवी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सायना नेहवाल, हेमा मालिनी, पी.व्ही. सिंधू, अरुण गोवील, आशा भोसले, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, गायक शंकर महादेवन, रजनीकांत, अनु मलिक, त्याचबरोबर मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी, अनिल अंबानी, बागेश्‍वर बाबा, बाबा रामदेव, कुमार मंगलम बिर्ला आदी मान्यवर पोहोचले होते. जय श्री रामाचे नारे गुंजत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10.25 वाजता अयोध्या विमानतळावर दाखल झाले. तेथून हेलिकॉप्टरने पंतप्रधान साकेत परिसरात आले. राम मंदिर परिसरात 30 कलाकार धून वाजवत होते. गायिका अनुराधा पौडवाल, सोनू निगम, शंकर महादेवन भक्‍तीगीतं सादर करीत होते. अमिताभ बच्चन ते अनिल अंबानीपर्यंत अनेक दिग्गज कलाकार, उद्योगपती मंदिर परिसरात उपस्थित होते. बागेश्‍वर बाबा, रामदेव बाबांचे आगमन झाले होते. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची अनुपस्थिती जाणवत होती. पण उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा यांची उपस्थिती आणि भावूक गळाभेट सर्वांचे लक्ष वेधून गेली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12 वाजता मंदिरात आले. रेशमी कुर्ता, उपरणे, धोतर असा त्यांचा वेष होता. मंदिराच्या पूर्व दरवाजातून प्रवेश करून नृत्य मंडपातून रंग मंडपात, तिथून गूढ मंडपात पोहोचले. तिथे ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत व इतर संत उपस्थित होते. पंतप्रधान गर्भगृहात पोहोचले आणि प्राणप्रतिष्ठा विधी सुरू झाले. पुजारी सुनील शास्त्री पूजा सांगत होते.
दुपारी 12.20 वाजता विधी समाप्‍त झाला. हेलिकॉप्टरने मंदिराला प्रदक्षिणा घालत पुष्पवर्षाव केला. पंतप्रधान व मान्यवरांनी कमल पुष्प हाती धरून रामउपसाना सुरू केली आणि प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे सर्व भारतवासीयांना दर्शन झाले. श्रीरामाचा जयजयकार सुरू होता. सनई वादनाचे सूर मंत्रमुग्ध करीत होते. अलंकाराने सुशोभीत, पुष्पमाळांनी सुशोभित अशी अतिपावन राममूर्तीचे दर्शन झाले. मस्तकी सोन्याचा मुकूट, तिलक, पिवळे पितांबर, रत्नजडीत कुंडल, सोन्याची कंठी, सोन्याच्या रत्नजडीत माळा, हाती धनुष्यबाण, अशी स्मितहास्य मुखी सावळ्या रामाच्या मूर्तीची अभिजित मुहुर्तावर प्राणप्रतिष्ठापना पूर्ण झाली. तिथेच मूळ श्री राम विराजमान मूर्तीची पूजाअर्चा करण्यात आली. राममंदिर परिसरात
हर्षोल्हासाचे वातावरण होते. देशभरात फटाके फोडत, घरोघरी अक्षता वाहून कुठे हनुमान चालिसा पठन, कुठे रामस्तुती गीत गात भक्‍तांनी आनंद साजरा केला. परदेशातील रामभक्‍तही या ऐतिहासिक महोत्सवात सहभागी झाले.
‘राजा राम, जय जय राममच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभू रामाची आरती केली. फल अर्पण केले, अक्षता वाहिल्या, मूर्तीला प्रदक्षिणा घातली, त्यानंतर मूर्तीसमोर साष्टांग दंडवत घातला, संतांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता पंतप्रधान मोदी मंदिरातून बाहेर आले. मंदिराच्या लगेच बाहेर फुलांनी सजवलेल्या मंचावरून पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केले.
मोदी म्हणाले की, सियावर रामचंद्र की जय, आज आपले राम अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर आले आहेत. तपस्या आणि बलिदानानंतर राम आले आहेत. आपले रामलल्‍ला तंबूत राहणार नाहीत. आता दिव्य मंदिरात राहतील. हा क्षण अलौकिक आहे, पवित्र आहे. प्रभू श्रीरामाचा सर्वांना आशीर्वाद आहे. 22 जानेवारी 2024 ही केवळ तारीख नाही तर नवीन कालचक्राची सुरुवात आहे. आज गुलामीची मानसिकता तोडून उभे राहणारे राष्ट्र, यानंतर हजारो वर्षे लोक या क्षणाची चर्चा करतील. आसमंत दिव्यतेने परिपूणे आहे. कालचक्रावर उमटलेली ही अमर रेखा आहे. जिथे राम तिथे पवनपुत्र हनुमान असतातच. त्यांना नमन करतो.
आज प्रभू रामाकडे क्षमा मागतो. आमची तपस्या, पुरुषार्थ कमी पडला असावा म्हणून इतकी दशके आपण हे कार्य करू शकलो नाही. आज ही कमी दूर झाली. प्रभू राम निश्‍चितपणे आपल्याला क्षमा करतील. त्या काळात 14 वर्षे वनवास झाला, तो असह्य होता. या काळात तर अनेक दशके आपण दूर राहिलो. प्रभू रामाच्या अस्तित्वाबाबत न्यायालयीन लढा झाला. न्यायालयाने आपली लाज राखली. हे मंदिरही धर्मानुसार बनले आहे. विश्‍वास आहे की, त्या काळात प्रभू रामाच्या आगमनाने कालचक्र बदलले, तसे आताही बदलेल. कालचक्र शुभ दिशेने प्रवास करील.
ज्यांच्या समर्पणामुळे आज हा क्षण अनुभवता आहे ते संत, कारसेवक, भक्‍त यांचे आपण ऋणी आहोत. हे मंदिर रामाच्या रुपातील राष्ट्र चेतनेचे प्रतिक आहे. त्रेता युगात राम आले तेव्हा हजारो वर्षे रामराज्य स्थापन झाले होते. आता मंदिर झाले. आपल्याला भविष्याचा पाया रचायचा आहे. भव्यदिव्य भारताच्या निर्माणाची शपथ घेऊ. देव ते देश, राम ते राष्ट्राच्या चेतनेचा विस्तार आहे. रामसमर्पण ते राष्ट्रसमर्पण हा उद्देश असावा. आता आपण विकासाच्या शिखरावर पोहोचू.

वस्त्र आणि आभुषणांनी नटले रामलल्ला
तमाम देशवासियांचे आणि जगभरातील भारतीयांचे लक्ष लागून राहिलेला राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडल्यानंतर म्हैसूरच्या अरुण योगीराज यांनी साकारलेली राममूर्ती पहिल्यांदा समोर आली. चेहर्‍यावर मंद स्मित आणि विविध आभुषणांनी नटलेली रामलल्लाची मूर्ती अत्यंत लोभसवाणी आहे. रामलल्लाच्या डोक्यावरील रत्नजडित मुकुट पाच किलो वजनाचा आहे. मुकुटावर नऊ रत्ने बसविली आहेत. गळ्यात रत्नांची माळ आहे. माथ्यावर टिळा, कानात सोन्याचे कवचकुंडल आणि पायात कडे, कंबरेभोवती सोन्याचा कमरपट्टा आणि अलंकारांनी ही मूर्ती सजलेली आहे. रामलल्लाने पितांबर नेसले असून हातात धनुष्यबाण आहे. गळ्यात रत्नजडित मोत्याचा हार आहे.

भागवतांच्या काळ्या कोटाची
सर्वत्र जोरदार चर्चा

अयोध्येतील ऐतिहासिक राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत चक्क काळा कोट घालून आले होते. विश्‍व हिंदू परिषद आणि संघ परिवाराकडून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला भगवे वस्त्र परिधान करून या असे सांगितले जात होते. असे असताना स्वतः सरसंघचालक मोहन भागवत हेच काळा कोट घालून या सोहळ्याला आल्याने त्याचीच आज जोरदार चर्चा होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top