सगेसोयरेवर तोडगा नाहीच मनोज जरांगे मोर्चावर ठाम

जालना – मराठा आरक्षणातील सगेसोयरे या मुद्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. 54 लाख नोंदी सापडल्या, पण तरीही सरकार आरक्षण का देत नाही? सरकारकडून केवळ दिशाभूल केली जात आहे. मुंबई दौर्‍यात विघ्न निर्माण करण्यासाठी सरकारच आमच्याविरोधात ट्रॅप रचत आहे. यासाठी मराठा समाजातीलच काही असंतुष्ट नेत्यांची मदत घेतली जात आहे. त्यांना सरकारची फूस आहे, पण आम्ही त्यांचा हा कट उधळवून लावू, अशी भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. आपण आपल्या मुंबई दौर्‍यावर ठाम असल्याचा
पुनरुच्चारही त्यांनी केला. मुख्यमंत्री शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटे आणि आमदार बच्चू कडू यांनी आज पुन्हा जरांगेंची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. ते 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता जालन्याच्या अंतरवाली सराटीमधून निघतील. त्यांच्या या आंदोलनाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. मात्र आंदोलनापूर्वी प्रसारमाध्यमांत मराठा आरक्षणावर तोडगा निघाल्याच्या बातम्या आल्या. त्यावर नाराजी व्यक्त करत मनोज जरांगे यांनी आज पत्रकारांशी बोलताना या बातम्यांत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
जरांगे-पाटील म्हणाले, मराठा आरक्षणातील ‘सगेसोयरे’च्या या मुद्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. या प्रकरणी सरकारकडून केवळ दिशाभूल केली जात आहे. मुंबई दौर्‍यात विघ्न निर्माण करण्यासाठी आमच्याविरोधात सरकार ट्रॅप रचत आहे. यासाठी मराठा समाजातीलच काही असंतुष्ट नेत्यांची मदत घेतली जात आहे. त्यांना सरकारची फूस आहे, पण आम्ही त्यांचा हा कट उधळवून लावू. मराठा समाज आता कुणालाही घाबरणार नाही. आता आमच्या मुलांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न आहे. आमच्या 250 बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत.
सरकारने भानावर येऊन या प्रकरणी गोडीगुलाबीने सकारात्मक तोडगा काढावा. मराठ्यांना मुंबईत पाय टाकू देणार नाही किंवा कायद्याचे हात लांब आहेत, असे आता काहीच चालणार नाही. मुंबईत अंतरवालीचा प्रयोग पुन्हा करू नये, हे संबंधितांनी लक्षात घ्यावे. मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय मागे मी हटणार नाही. सरकारने मला गोळ्या घालून ठार केले तरी चालेल, पण मराठा बांधवांनी आपली एकजूट सुटू देऊ नका. माझे विचार मरू देऊ नका. आंदोलन सुरूच ठेवा. तरच माझे बलिदान सार्थक होईल, अन्यथा नाही.
‘सगेसोयरे’ या मुद्यावर स्पष्टीकरण देताना जरांगे म्हणाले की, राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या शेवटच्या बैठकीत त्यांनी दिलेल्या मसुद्यात ‘सगेसोयर्‍यां’ना प्रमाणपत्रे देण्याबाबत मुद्दा स्पष्ट नाही. शिष्टमंडळाने सांगितले होते की, येत्या 6 दिवसांत दिवस-रात्र काम करून नोंदी सापडलेल्या 54 लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देतो. पण अद्यापही प्रमाणपत्रांचे वाटप झालेले नाही. मसुदा तयार केला जातो. तो वाचायला आणि दुरुस्ती करायला माझ्याकडे येतो. यातच 2 महिन्यांचा वेळ घेतला. त्यानंतर मुंबईत येण्याची घोषणा आम्ही 29 डिसेंबरअखेर केली होती. त्यानंतरही सरकारला 1 महिन्याचा वेळ मिळाला. राक्षस भवनचे पुरावे, भाटांचे पुरावे, देवी-लसचा पुरावा का घेतला नाही?, तुळजाभवानी मंदिरात पुरावे शोधले का?, दीड महिने झाले कागदपत्रे देऊनही प्रमाणपत्र देत नाही, हैदराबादचे, सातारा संस्थानचे, मुंबईचे गॅझेट का घेत नाही, मराठवाड्यात कमी प्रमाणपत्रे का दिली?, तुमच्या हातात सत्ता आहे, त्यामुळे वाटत असेल की, तुमच्या एवढे हात वर पोहोचले आहेत. पण जनतेएवढे हात कोणालाच नाहीत.
राज्य सरकारच्या ट्रॅपची
20 तारखेनंतर पोलखोल

जरांगेंनी आज पत्रकार परिषदेत सरकार माझ्याविरुद्ध ट्रॅप रचत आहे, असा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, मी सरकारच्या बाजूने नाही. सरकारचा ट्रॅप काय आहे हे मी 20 तारखेनंतर सांगणार. बैठकीत काही मंत्री, पालकमंत्री आरक्षण देण्यासाठी विरोध करत आहेत. त्यांची नावे मला माहीत आहेत. ते मी करणार. काहींना सरकारने हाताशी धरले. ते रॅलीमध्ये येतील आणि फोटो काढून निघून जातील. मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचे काम त्यांना देण्यात आले आहे. पण, मराठ्यांनी कुणाचे ऐकू नये. सरकार अफवा पसरवत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top