समलिंगी विवाहाची नोंदणी करणारा नेपाळ दक्षिण आशियातील पहिला देश

काठमांडू :

समलिंगी विवाहाची नोंदणी करणारा नेपाळ हा दक्षिण आशियातील पहिला देश ठरला आहे. ३५ वर्षीय ट्रान्सजेंडर माया गुरुंग आणि २७ वर्षीय समलैंगिक सुरेंद्र पांडे यांनी कायदेशीर विवाह केला आहे. त्यांच्या लग्नाची नोंदणी पश्चिम नेपाळमधील लामजुंग जिल्ह्यातील दोर्डी ग्रामीण नगरपालिकेत करण्यात आली आहे. सुरेंद्र आणि माया गेल्या ६ वर्षांपासून एकत्र राहत होते. घरच्यांच्या संमतीने पारंपारिक पद्धतीने त्यांचे लग्न पार पडले.

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने ५ महिन्यांपूर्वी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती. याबाबत ब्लू डायमंड सोसायटीचे अध्यक्ष संजीब गुरुंग (पिंकी) म्हणाले की, ‘केवळ नेपाळमध्येच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असून आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.’ ब्लू डायमंड सोसायटी ही संस्था नेपाळमधील ट्रान्सजेंडर्सचे हक्क आणि कल्याणासाठी काम करते. माध्यमांशी बोलताना माया म्हणाल्या, “आमच्या लग्नाची औपचारिक नोंदणी करताना आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या लग्नाची नोंदणी करण्याच्या निर्णयामुळे आम्हाला आमचा सन्मान झाल्यासारखे वाटत आहे.”

२००७ मध्येच नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला परवानगी दिली होती. २०१५ मध्ये स्वीकारलेल्या नेपाळच्या राज्यघटनेतही लैंगिक अभिमुखतेच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही असे स्पष्टपणे नमूद केले आहे. परंतु समलिंगी विवाहांची तात्पुरती नोंदणी करण्याचा ऐतिहासिक आदेश असूनही, काठमांडू जिल्हा न्यायालयाने आवश्यक कायद्यांचा अभाव असल्याचे कारण देत ४ महिन्यांपूर्वी हे पाऊल नाकारले. त्यावेळी सुरेंद्र पांडे आणि माया यांचा विवाह अर्ज फेटाळण्यात आला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top