सामाजिक तणाव निर्माण करून काँग्रेस पुढील 1 महिन्यात काहीतरी अघटित घडवेल

कराड- आज सोलापूर, कराड, पुणे येथे जाहीर सभांसाठी महाराष्ट्रात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराडच्या सभेत काँग्रेसवर दोन गंभीर आरोप केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस देशभरात धर्माच्या आधारावर आरक्षण देणार आहे. पुढील एक महिन्यात काँग्रेस सामाजिक तणाव निर्माण करून कोणतीतरी अघटित घटना घडविणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मला सर्वांनी सांगितले की, साताऱ्यात यायची गरज नाही. कारण इथे भगवाच फडकतो. पण मला तुमचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यायचा होता. त्यासाठी मी आलो.
2013 ला पंतप्रधान उमेदवार म्हणून माझे नाव घोषित केले तेव्हा मी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक झालो होतो. मोदी सरकारने स्वदेशी शस्त्रनिर्मिती केली, वन रँक वन पेन्शन आणले, नौदलाच्या झेंड्यावरील इंग्रजांचे निशाण हटविले, महाराष्ट्रातील किल्ले जागतिक वारसा यादीत आणायचा प्रयत्न करीत आहोत, कलम 370 हटविले, मोदींनी ही आश्वासने दिली आणि ती पूर्ण केली.
भारताच्या घटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणावर बंदी आहे. पण काँग्रेसने कर्नाटकात रातोरात मुस्लिमांना ओबीसीचे 27 टक्के आरक्षण दिले. हेच त्यांना देशबर लागू करायचे आहे. मात्र मोदी जिवित आहेत तोपर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण येऊ देणार नाही. घटनेत बदल करू देणार नाही. आता ते फेक व्हिडिओ आणून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शांततेत मतदान करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शांततेत मतदान झाले तर त्यांचे काहीही खरे नाही. म्हणूनच सामाजिक तणाव निर्माण करून पुढील एक महिन्यात अघटित घडविण्याचे त्यांचे षडयंत्र आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
काँग्रेस म्हणत आहे की, तुमचे घर, तुमची शेती, तुमचे दागिने, तुमचे मंगळसूत्र याचा एक्सरे करणार आहेत. म्हणजेच छापे टाकून मोजतील आणि मग त्यांची खास व्होटबॅक आहे त्यांना खूष करण्यासाठी त्यांच्यात तुमची संपत्ती वाटून टाकणार आहेत. शेवटी त्यांनी आवाहन केले की 7 मे रोजी मोठ्या संख्येने भाजपाला मतदान करा. पूर्वीचे मतदानाचे रेकॉर्ड तोडा.
देश लुटण्यासाठी पाच पंतप्रधान हवेत!
पुण्याच्या सभेआधी सोलापूर येथे भाजपा उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, या लोकांनी आता यांनी देशाला पाच वर्षांत, पाच पंतप्रधान देण्याचा नवीन फॉर्म्युला आणला आहे. म्हणजेच पहिल्या वर्षी एक पंतप्रधान बनेल. तो त्याला हवा तितका आपल्या देशाचा खजिना लुटेल. त्यानंतर पुढच्या वर्षी दुसऱ्या पक्षाचा नेता पंतप्रधान होईल. तो वर्षभर लुटमार करेल. त्यानंतर पुढची तीन वर्षे तीन नवे पंतप्रधान बनतील आणि ते लोक देश लुटतील. असे सलग पाच वर्षे चालेल. हे सगळे एवढ्यावरच थांबलेले नाही. नकली शिवसेनावाले म्हणतायत की त्यांच्या आघाडीत पंतप्रधानपदासाठी खूप पर्याय आहेत. त्यांचा बोलघेवडा नेता तर म्हणतो आहे की, आम्ही एका वर्षांत चार पंतप्रधान बनवले तर बिघडले कुठे. इतका मोठा देश आहे. तो पाच वर्षांत पाच वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या फॉर्म्युलाने चालेल का? आपण कधी त्या दिशेला जाऊ शकतो का? परंतु त्यांच्याकडे (इंडिया आघाडी) सत्ता मिळवण्याचा हा एकमेव पर्याय उरला आहे. त्यांना देश चालवायचा नाही, त्यांना तुमच्या भविष्याची चिंता नाही, त्यांना तर केवळ मलाई खायची आहे.
मोदींच्या व्यासपीठावर अमित ठाकरे
आज पुण्यात झालेल्या महायुतीच्या सभेचे मनसेलाही निमंत्रण होते. त्यामुळे राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांना व्यासपीठावर मोदी, फडणवीस, अजित पवार यांच्या रांगेत बसण्याची संधी संधी मिळाली. ते महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शेजारी बसले होते, तर हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपचे काही मोठे नेते मागच्या रांगेत बसले होते यावेळी अमित ठाकरे यांनी मोदींशी हस्तांदोलन केले.
पुण्यात आयुष कांबळेचे धाडस
मोंदींना सवाल करणारे बॅनर

पुणे- आज पुण्यातील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा असल्याने रस्त्याच्या दुतर्फा भाजपाचे स्वागताचे बॅनर लावलेले असताना याच रांगेत काही ठिकाणी मोदींना सवाल करणारे बॅनर झळकले. आयुष दीपक कांबळे याने हेे बॅनर लावले होते. हे बॅनर पाहून पोलिसांची धावपळ झाली आणि त्यांनी घाईने हे बॅनर खाली उतरवले.
आयुष दीपक कांबळे, सुशिक्षित बेरोजगार असे बॅनरवर लिहून दीपकने स्वतःचा फोन नंबरही टाकला होता. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले, मग आम्ही काय करायचे? असा सवाल या बॅनरवरून नरेंद्र मोदींना विचारला होता. याबाबत बोलताना दीपक म्हणाला की, जो बोलेल त्याला जेलमध्ये जावे लागेल. या भीतीने कुणी प्रश्न विचारत नाही. पण कुणीतरी हे प्रश्न विचारायला हवे म्हणून मी विचारले. मला यानंतर दडपशाहीचा सामना करावा लागेल, पोलिसांचे फोन येतील हे मला माहीत आहे. पण मी बेकायदा काही केले नाही. त्यामुळे मला भीती नाही. मी कुणाच्या सांगण्यावरून हे बॅनर लावले नाहीत. मला प्रश्न विचारायचे होते म्हणून मी बॅनर लावले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top