सायन रेल ब्रीज पाडण्याची तारीख पुन्हा पुढे ढकलली

मुंबई- सायन येथील रेल ओव्हर ब्रीज पाडण्याचे काम आज मध्यरात्रीपासून हाती घेतले जाणार होते. याच पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून सायन ब्रिज वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता. मात्र, हा ब्रिज पाडण्याची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. राज्यात बारावीच्या परीक्षा सुरु असून शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षा देखील सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ब्रिज पाडण्याची तारीख पुढे ढकलली आहे.
ऐन परीक्षेच्या काळात सायन ब्रिज पाडण्यात येऊ नये यासाठी प्रयत्न सुरु होते. पूल वाहतुकीसाठी बंद केल्यास या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेला जाण्यासाठी गैरसोय होऊ शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला. दरम्यान, मध्य रेल्वे महापालिकेच्या मदतीने सायन रेल्वे स्थानकाजवळ जुन्या रेल्वे पुलाच्या जागी नवीन पूल बांधणार असून, प्रकल्पाच्या खर्चासाठीचे २३ कोटी रुपये मध्य रेल्वे तर २६ कोटी रुपये महापालिका देणार आहे. नवीन पूल हा सिंगल स्पॅन सेमी-थ्रू गर्डर्स ४९ मीटर लांबीचा आणि २९ मीटर रुंदीचा आरसीसी स्लॅब पद्धतीचा असेल. सायन येथील रेल्वे पूल पाडण्याल्यानंतर मुंबईला पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल होतील. या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्यानंतर २ वर्षांत नवीन पूल बांधून पूर्ण केला जाईल. २० जानेवारी रोजी या पूलाचे पाडकाम माती घेतले जाणार होते. मात्र स्थानिक परिसरातून विरोध झाल्यानंतर याबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आज पुन्हा एकदा ब्रिज पाडण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top