सायमन हॅरिस आयर्लंडचे सर्वात तरूण पंतप्रधान

डब्लिन

आयर्लंडने उच्च शिक्षण मंत्री सायमन हॅरिस यांची पंतप्रधानपदी निवड केली आहे. ३७ वर्षीय हॅरिस हे आयर्लंडचे सर्वांत तरूण पंतप्रधान आहेत. यापूर्वी भारतीय वंशाचे लिओ वराडकर हे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. मात्र वराडकर यांनी गेल्या महिन्यात वैयक्तिक आणि राजकीय कारणांमुळे त्यांच्या पंतप्रधान पदाचा आणि पक्ष नेतृत्वाचा राजीनामा दिला. त्यांनतर काल हॅरिस यांची आयर्लंडच्या पंतप्रधान पदी निवड करण्यात आली.

आयर्लंडच्या संसदेत हॅरिस यांच्या बाजूने ८८ विरुद्ध ६९ असे मतदान झाले. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष मायकल डी हिगिन्स यांनी हॅरिस यांच्या नावाची पंतप्रधानपदी अधिकृत घोषणा केली. हॅरिस यांनी म्हटले की, ‘आज तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा सन्मान राखण्यासाठी मी जे काही करू शकतो ते मी करण्यास वचनबद्ध आहे. हे युतीचे सरकार आहे आणि एकता, सहकार्य आणि परस्पर आदराच्या भावनेने नेतृत्व करण्याचा माझा मानस आहे. आम्ही नवीन कल्पना आणि नवीन ऊर्जा आणू. मला आशा आहे की, सार्वजनिक जीवनात एक नवीन सहानुभूती आहे. वेळ नक्कीच कमी आहे आणि बरेच काही करायचे आहे.’

हॅरिस हे माजी पंतप्रधान लिओ वराडकर यांच्या सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री होते. दरम्यान, आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान झाल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायमन हॅरिस यांचे अभिनंदन केले. तसेच भारत-आयर्लंड द्विपक्षीय भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी पोस्ट करत म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top