सुदानमध्ये उपासमारीची स्थिती जागतिक संघटनेचा इशारा

खार्तुम सुदान
सुदानच्या डार्फर भागात उपासमारीची स्थिती निर्माण झाली असून येथील लोकांना गवत आणि शेंगांची टरफले खाऊन दिवस काढावे लागत आहेत. त्यांना लवकरच मदत मिळाली नाही तर इथे उपासमारीने अनेक जीव जातील असा इशारा जागतिक अन्न कार्यक्रमाचे प्रादेशिक संचालक मिशेल डनफोर्ड यांनी दिला आहे.
ही उपासमारीची स्थिती सुदानच्या इतर भागातही पसरण्याची भिती असून त्यामुळे इथे हिंसा अधिक वाढू शकते असाही इशारा देण्यात आला आहे. सुदानमध्ये एप्रिल २०२३ मध्ये नागरी उठाव झाला होता. सुदानचे लष्कर व निमलष्करी दलामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. निमलष्करी दलाचे लष्करात विलीनीकरण करण्यावरुन हा वाद उफाळला आहे. हे एक क्रुर युद्ध असून यामध्ये निर्वासितांवर लैंगिक अत्याचार, जीवे मारणे आदी प्रकार सुरु असल्याची माहितीही मिशेल यांनी दिली. या संघर्षात गेल्या गुरुवारी आतंरराष्ट्रीय रेडक्रॉस सोसायटीच्या वाहनचालकांना मारुन टाकण्यात आले होते. त्याचबरोबर तीन लोकांना जखमी करण्यात आले होते. मदत करणाऱ्या रेडक्रॉसच्या अनेक कर्मचाऱ्यांवरही हल्ले करण्यात आले आहेत. या गृहयुद्धामुळे ८७ लाखांपेक्षा अधिक लोक सुदान सोडून शेजारच्या चाड देशात जात आहेत. डार्फर च्या उत्तरेकडील राजधानीच्या शहरावर झालेल्या हल्ल्यामुळे इथे मोठा नरसंहार झाला होता. या ठिकाणी नरसंहाराबरोबरच गावेच्या गावे जाळून टाकण्याच्याही घटना घडत आहेत. काही गावांवर सतत बॉम्बहल्लेही होत आहेत. डार्फर भागावर अद्याप निमलष्करी दलाने ताबा मिळवलेला नाही. असे असले तरी इथे अनेक लोकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यावर ही उपासमारीची पाळी आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top