सुनेच्या विजयासाठी खडसे‌ ‘डमी‌’ राष्ट्रवादी उमेदवार देणार! – चंद्रकांत पाटलांचा आरोप

रावेर- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे वैयक्तिक स्वार्थासाठी रावेरमध्ये मोठे राजकारण करत असल्याचा आरोप अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपाची रावेरची उमेदवार असलेली आपली सून रक्षा खडसे हिच्या विजयासाठी, राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे तिच्या विरोधात डमी उमेदवार उभा करण्याच्या तयारीत खडसे असल्याचे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे. काही दिवसांत एकंदर चित्र स्पष्ट झाल्यावर आपण आपली रणनीती ठरवू असे त्यांनी स्पष्ट केले.एकनाथ खडसे यांनी रावेरमधून निवडणुक लढण्यात स्वारस्य दाखवल्यामुळे मविआमध्ये ही जागा राष्ट्रवादीने मागून घेतली, आणि त्यांच्या विरोधात भाजपाने रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्यावर एकनाथ खडसेंनी तब्येतीचे कारण पुढे करून निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवली. आता ते इतर इच्छुकांना शरद पवारांकडे नेत आहेत आणि त्यांपैकी एक जण राष्ट्रवादीचा डमी उमेदवार असेल असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
आपण अपक्ष असलो तरी महायुतीबरोबर असून, खडसे राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जी ‌‘पद्धत‌’ वापरतील तीच ‌‘पद्धत‌’ आपण महायुतीच्या प्रचारासाठी वापरू, ते ज्या ‌‘ताकदीने‌’ राष्ट्रवादीचा प्रचार करतील त्याच ‌‘ताकदीने‌’ आपण भाजपाचा प्रचार करू, या शब्दात त्यांनी खडसेंना टोला दिला. दरम्यान रावेरमधून निवडणूक लढण्यास आपण इच्छुक नाही, इच्छुक उमेदवारांची आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्याशी भेट झाली असून उमेदवारी देण्याच्या दृष्टीने काहींची छाननीही झाली आहे, उमेदवाराच्या नावाची घोषणा उद्या केली जाईल अशी प्रतिक्रिया भाजपामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात गेलेले नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top