सुरतमधील सुरूची मिल अचानक बंद! चारशे कामगारांना वाऱ्यावर सोडले

सुरत – कडोदरा येथील सुरूची टेक्स्टाईल डाईंग अँड प्रिंटिंग मिल कामगारांना कोणतीही पूर्व सूचना न देता मालकाने बंद केली. त्यामुळे चारशे कामगार बेरोजगारीच्या खाईल लोटले गेले आहेत. सुरूची मिल ही ललित जैन या उद्योजकाच्या मालकीची आहे. या मिलमध्ये ४०० कामगार होते. १७ फेब्रुवारी रोजी जैन यांनी कामगारांना विश्वासात न घेता, काहीही स्पष्टिकरण न देता मिल बंद केली.नेहमीप्रमाणे १७ फेब्रुवारी रोजी कामगार कामावर हजर झाले असता मिलचा व्यवस्थापक बलबीर यांने त्यांना मिल बंद करण्यात आली आहे,असे सांगून घरी जाण्यास सांगितले. मालकाच्या या मनमानी कारभारामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला असून काही कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मिल मालकावर कामगार कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या तेरा महिन्यांपासून हे कामगार सुरूची मिलमध्ये काम करीत होते. परंतु व्यवस्थापनाकडून त्यांना हजेरी कार्ड कधीच देण्यात आले नाही. तसेच कामगारांचा मागील दोन महिन्यांचा पगारही दिलेला नाही. त्यातच आता मिल बंद करण्यात आल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दक्षिण गुजरात कामगार असोसिएशन या कामगारांच्या हक्कांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे.असोसिएशनच्या वतीने सुरतमधील कामगार उपायुक्त आणि कंपनी निरीक्षकांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र मालक ललित जैन याच्यावर कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही.त्यामुळे आता जिल्हाधिकारी तरी याप्रकरणी कामगारांच्या हितासाठी काही कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. जिल्हाधिकऱ्यांनीदेखील कठोर निर्णय घेतला नाही तर कामगार न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top