सुसज्ज आहे तव सिंहासन, करो प्रभू स्वीकार! त्रिवार जयजयकार रामा! त्रिवार जयजयकार

अयोध्या- अखेर तो क्षण समीप आला आहे! उद्या अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम गर्भगृहात विराजमान होत आहेत. श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना अवघा देश आणि जगातील कानाकोपऱ्यातले भारतवासी दुसरी दिवाळी साजरी करणार आहेत. एक वेगळाच उत्साह आणि भक्तीरसाची ऊर्जा देशात संचारलेली पहायला मिळत आहे.
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेपूर्वीच्या अनुष्ठानाचा आज सहावा दिवस होता. आज प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर 114 कलशांतून जलाभिषेक करण्यात आला. विशेष म्हणजे यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील तीन नद्यांचे पवित्र जलही वापरण्यात आले आहे. श्रीरामाचा मध्याधिवास विधी आज पार पडला. संध्याकाळी शय्याधिवासाचा विधी झाला. 16 जानेवारीपासून हे अनुष्ठानाचे विविध विधी सुरू होते. 12 निवासविधींनंतर आज संध्याकाळी शय्याधिवास विधी आणि त्यानंतरच्या आरतीनंतर विधींची सांगता झाली. उद्या कोट्यवधी भारतीयांच्या साक्षीने होणाऱ्या ऐतिहासिक श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे.
मंदिराची विविधरंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे. यासाठी तब्बल 2 हजार क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला आहे. प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी सकाळी दहा वाजल्यापासून मंदिर परिसरात मंगल ध्वनी गुंजणार आहे. विविध राज्यांतून आलेले 50 हून अधिक वादक वाद्ये वाजवणार आहेत. हा कार्यक्रम दोन तास सुरू राहील. प्राणप्रतिष्ठेसाठी विशेष मुहूर्त साधण्यात येणार आहे. दुपारी 12.20 वाजता श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा विधीला सुरूवात होईल आणि हा विधी दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. वाराणसीचे आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या हस्ते मुख्य विधी होणार आहेत, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली. प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाल्यावर मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवर्षाव करण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा मुख्य यजमान असतील. पंतप्रधान मोदी या संपूर्ण सोहळ्यासाठी उद्या चार तास अयोध्येत असणार आहेत. सकाळी 10.55 वाजता त्यांचे अयोध्येत आगमन होईल. त्यानंतर 12 वाजून 5 मिनिटांनी अभिषेक पूजेला सुरुवात होईल. प्राणप्रतिष्ठा विधीनंतर दुपारी 1 वाजता मोदी मनोगत व्यक्त करतील. दुपारी 2.15 वाजता कुबेर टीळा येथे मोदींच्या हस्ते पूजा होणार आहे. सायंकाळी राम की पैडी (पायरी) येथे एक लाख तर संपूर्ण अयोध्येत 11 लाख दिवे उजळवण्यात येणार आहेत. अयोध्येतील विविध 100 ठिकाणी सांस्कृतिक शोभायात्रा निघणार आहेत. यात विविध राज्यातील 200 लोककलाकार सहभागी होणार आहेत.
उद्याच्या सोहळ्यासाठी 7,140 पाहुणे येणार आहेत. 112 परदेशी पाहुणेही असतील. 150 चार्टर्ड विमाने अयोध्येत उतरणार आहेत. अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून राम मंदिरापर्यंतचा रस्ता फुलांनी सजवण्यात आला आहे. गोध्रा ट्रेन अग्निकांडात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांनाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. याबाबत विश्व हिंदू परिषदेचे गुजरातचे सरचिटणीस अशोक रावल यांनी सांगितले की, ‘2002 साली गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेस ट्रेनच्या दोन डब्यांना आग लावण्यात आली होती. यात 59 कारसेवकांचा मृत्यू झाला. ते कारसेवक अयोध्येहून अहमदाबादला परतत होते. या घटनेनंतर गुजरातच्या इतिहासातील सर्वात भीषण जातीय दंगल झाली, ज्यामध्ये 1,000 हून अधिक लोक मारले गेले. या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 59 कारसेवकांपैकी 19 कारसेवकांच्या कुटुंबांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.’
अनेक विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. यात रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, आई कोकिलाबेन, मुले, सुना असा संपूर्ण परिवार या सोहळ्यावेळी हजर असेल. रतन टाटा, एअर इंडियाचे प्रमुख एन. चंद्रशेखरन, गौतम अदानी, अझीम प्रेमजी, कुमारमंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा, अजय पिरामल या उद्योगपतींनाही आमंत्रण आहे. अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत, अक्षय कुमार, अजय देवगण, कंगना रणौत, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, प्रभास, अलु अर्जुन, ज्यु. एनटीआर, चिरंजिवी, मोहनलाल, सनी देओल, हेमा मालिनी हे कलाकार या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या या भव्य सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सर्वांना पाहता येणार आहे. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर या सोहळ्याचे उद्या सकाळी 11 वाजल्यापासून थेट प्रक्षेपण दिसणार आहे. यासाठी दूरदर्शनचे 40 कॅमेरे अयोध्येत विविध ठिकाणी चित्रीकरण करणार आहेत. देशभरातील मंदिरांमध्ये, गावागावात, शहरात, जाहीर ठिकाणी हे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येईल. रेल्वे स्थानकांवरील 9 हजार स्क्रीन्सवरही हा सोहळा पाहता येणार आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यासाठी अयोध्येत दहा हजार सीसीटीव्ही लागले आहेत. 13 हजार पोलिसांची फौज तैनात आहे. यलो आणि रेड झोनमध्ये 400 सीसीटीव्ही कॅमेरे इंटिग्रेटेड कंट्रोल रुमशी जोडण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस, राखीव पोलीस, शीघ्र कृती दल, दहशतवाद विरोधी गट आणि एसटीएफची पथके सज्ज आहेत.
भाजपाचे अध्यक्ष
जाणार नाहीत

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अनुपस्थित राहणार आहेत. त्यांनीच याबाबत एक्सवरून माहिती दिली. ते पोस्टमध्ये म्हणाले की, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे मला अयोध्यामध्ये श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. याबाबत मी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे आभार मानतो. 500 वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिराचे भव्य निर्माण होताना पाहण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. मी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर लवकरच सहकुटुंब दर्शनासाठी अयोध्येत जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top