सेन्सेक्सची विक्रमी ७१ हजारांवर उसळी

सेन्सेक्सने आज ७१,००० अंशांचा विक्रमी टप्पा गाठला. अमेरिकन अर्थव्यवस्था वाढीच्या लक्षणासह देशांतर्गत आघाडीवर अर्थव्यवस्थेविषयक सकारात्मक आकडेवारीमुळे शुक्रवारच्या सत्रात निर्देशांकांनी १ टक्क्यांची वाढ साधली. माहिती तंत्रज्ञान, धातू आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसली.

दिवसअखेर सेन्सेक्सने ९६९.५५ अंशांची म्हणजेच १.३७ टक्क्यांनी उसळी मारून ७१,४८३.७५ या विक्रमी उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात सेन्सेक्सने १,०९१.५६ अंशांची कमाई करत ७१,६०५.७६ ही सर्वोच्च पातळी गाठली होती. दुसरीकडे निफ्टी २७३.९५ अंशांनी म्हणजेच १.२९ टक्क्यांनी वाढून २१,४५६.६५ या नवीन उच्चांकावर स्थिरावला.

अमेरिकन आर्थिक धोरणाच्या सामान्यीकरणामुळे तेथील अर्थव्यवस्था रुळावर येण्याची दिसत असलेली चिन्हे आणि पुढील आर्थिक वर्षात व्याजदर कपातीच्या आशेने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे बाजारात तेजी टिकून आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेतील मागणी वाढण्याच्या अपेक्षेपेक्षा शुक्रवारच्या सत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांनी उच्चांकी झेप घेतली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top