सोमनाथ मंदिराप्रमाणे अयोध्येत प्रतिष्ठापना राष्ट्रपतींनी करावी! उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई- उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हटले की, गुजरातच्या सोरटी सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण केल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. अयोध्येच्या श्रीराममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अशाच पद्धतीने राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवा, पण त्यांना केवळ उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा ही केवळ राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा नसून आपल्या राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा आहे. देशाच्या अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करावे आणि या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करावी, अशी आमची मागणी आहे. राम मंदिर व्हावे अशी लाखो बांधवांप्रमाणे आमची देखील इच्छा होती. राम मंदिर व्हावे अशी बाळासाहेबांची इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण होत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या पवित्र क्षणी आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. मात्र अयोध्येत बाबरी मशीद बांधली तशी सोमनाथ मंदिरावरही मुघल आक्रमकांनी हल्ला करत त्याचा विध्वंस केला होता. वल्लभभाई पटेलांनी पुढाकार घेऊन त्याचे पुनर्निर्माण केले. प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या वेळी वल्लभभाई पटेल नव्हते (त्यांचे निधन झाले होते). त्यामुळे सोमनाथ मंदिरात प्राणप्रतिष्ठा तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी केली होती. याचप्रमाणे अयोध्येतही प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन आरती करणार आहोत. यानंतर गोदावरी नदीच्या काठी आरतीदेखील करणार आहोत. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करीत आहोत. आमचे खासदार राष्ट्रपतींना या सोहळ्याचे रीतसर आमंत्रण देण्यासाठी जाणार आहेत. 23 जानेवारीला नाशिकमध्ये पक्षाची मोठी सभा होईल.

राम मंदिर निर्माणातील कारसेवकांच्या योगदानाबद्दल ठाकरेंनी सांगितले की, कारसेवकांनी धाडस केले नसते तर अयोध्येत आज राम मंदिर उभे राहिले नसते. राम मंदिर हा कारसेवकांचा गौरव आहे. झेंडे लावायला अनेक येतात पण लढण्याची वेळ होती, तेव्हा तुम्ही कुठे होतात? शिवसेनेची घोषणा होती, पहले मंदिर, फिर सरकार. राम मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा आता त्यांनी केला आहे. पण जेव्हा राममंदिर निर्माण झाले नव्हते तेव्हा आम्ही दोन वेळा तेथे गेलो होतो. मी अयोध्येत शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. यानंतर एका वर्षाच्या आत न्यायालयाने राम मंदिराबाबत सकारात्मक निर्णय दिला. मी कडवट हिंदुत्ववादी आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान सर्वांना माहीत आहे. मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही. मी अयोध्येला नक्की जाणार. राम मंदिर कुणाची खासगी मालमत्ता नाही. ज्या ज्यावेळी माझ्या मनात येईल त्या त्यावेळी मी राम मंदिरात जाणार आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, या दिवशी दिवाळी साजरी झाली पाहिजे. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, पण त्यानंतर त्यांच्या सत्तेच्या काळात जे दिवाळे निघाले आहे त्यावर सुद्धा चर्चा करा.
अटल सेतूबाबत ठाकरेंनी सरकारला टोला लगावला. ते म्हणाले की, अटल सेतूचे उद्घाटन केले, पण अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो कुठे होता? आता राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. पण राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना?

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून काळाराम मंदिरातील आरतीचे निमंत्रण दिले आहे. या पत्रात लिहिले आहे की, अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे तर नाशिक ही कर्मभूमी आहे. बारा वर्षांच्या वनवासात प्रभू श्रीरामांनी काही काळ नाशिक-पंचवटी- दंडकारण्यात व्यथित केला होता. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या कालावधीत रामाचे येथील आदिवासी – वनवासींसोबत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. रामाच्या वास्तव्याच्या खाणाखुणा आजही नाशिकमध्ये अस्तित्वात आहेत. काळाराम मंदिर हे त्याचेच एक मूर्तस्वरूप आहे. प्रभू राम हे केवळ हिंदू धर्म आणि हिंदुत्वापुरते मर्यादित नाहीत. ते देशाच्या अस्मितेचे, देशवासियांच्या आस्थेचे प्रतिक आहेत. त्याच अतूट आस्थेने नाशिकच्या काळाराम मंदिरात 22 जानेवारी रोजी आम्ही महाआरती आणि महापूजन सोहळ्याचे आयोजन केले आहे. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top