हमास दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण इस्रायलकडून छायाचित्र प्रसिद्ध

जेरुसलेम :

गाझामधील अनेक हमास दहशतवाद्यांनी इस्रायली सैन्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ इस्रायलने प्रसिद्ध केले आहेत. ज्यात हमासच्या दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचे दिसत आहे. हे आत्मसमर्पण जबेलिया भागात झाले. आत्मसमर्पण करताना अनेक लोक फक्त अंतर्वस्त्रांमध्ये दिसत असून आणि त्यांच्याजवळ सैनिक उभे आहेत. गाझाच्या उत्तरेकडील भागातही काही लोकांनी आत्मसमर्पण केले आहे. मात्र, त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केले नाहीत.

या सर्व लोकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असून त्यांचे हात पाठीमागे बांधलेले आहेत. इस्रायली संरक्षण दलाने अद्याप या संदर्भात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दुसरीकडे अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये एका व्यक्तीने ज्यू मंदिराबाहेर गोळीबार केला. तो ‘फ्री पॅलेस्टाईन’च्या घोषणा देत होता असे सांगितले जाते. त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा मृत्यू झालेला नाही. गव्हर्नर कॅथी हॉचुल म्हणाल्या की, आरोपी २८ वर्षाचा आहे. तो स्थानिक रहिवासी असून गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यामुळे तो दु:खी झाला होता.

दरम्यान, लेबनॉनमधून इस्रायलवरील हल्ले तीव्र झाले आहेत. काल लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने पुन्हा इस्रायलच्या हद्दीत रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला. याबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाला धमकी दिली. ते म्हणाले, ‘लेबनॉनकडून होणारे हल्ले थांबले नाहीत तर इस्त्रायली सैन्य गाझाप्रमाणे राजधानी बेरूतला उद्ध्वस्त करेल. हमासच्या हल्ल्याच्या एक दिवसानंतर ८ ऑक्टोबरपासून इस्रायलवर लेबनॉनमधून हल्ले होत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top