हवामान बदलामुळे भारतासाठी २०११ -२० दशक उष्ण, अतिवृष्टीचे

जागतिक हवामान संघटनेचा अहवाल

दुबई :

भारतासाठी २०११ ते २०२० हे दशक हवामान बदलामुळे अतिवृष्टीचे (पुरांचे) आणि उष्णतेचे ठरले आहे. या काळात हवामान बदलाचा वेग वाढला. त्यामुळे भारतासाठी सर्वात उष्ण दशकाची नोंद झाली. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत (सीओपी-२८) काल जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) सादर केलेल्या ‘२०११ ते २०२० च्या दशकातील पर्यावरणीय स्थिती’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेत (यूएन सीओपी २८) सादर झालेल्या २०२३ च्या अंतरिम वार्षिक अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, ‘२०११ ते २०२० या दशकात भारतासह आग्नेय आशिया, युरोप, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको आणि पूर्व ऑस्ट्रेलियाच्या काही भागांत १९६१ ते १९९० च्या सरासरीपेक्षा तापमानापेक्षा सुमारे दुप्पट तापमान होते. २०११ ते २०२० या दशकात पडलेल्या दुष्काळांमुळे महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक आणि मानवी जीवनावर दुष्परिणाम घडले. भारतातच, २८ पैकी ११ राज्यांत दुष्काळ जाहीर केला होता. त्यामुळे अन्न आणि पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले. पाणी उपलब्धता आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली.’

जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार, जगभरातील हिमनद्या दरवर्षी सुमारे एक मीटरने वितळत आहेत, ज्यामुळे लाखो लोकांच्या पाणी पुरवठ्यावर दीर्घकालीन परिणाम होत आहेत. २००१-२०१० च्या तुलनेत २०११-२०२० दरम्यान अंटार्क्टिकाच्या हिमाच्छादित भागातून ७५ टक्क्यांहून अधिक हिम वितळले आहे. त्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होऊन सखल किनारी प्रदेश-बेट आणि देशांचे भविष्यातील अस्तित्व धोक्यात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top