११ दिवसानंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढली? संजय राऊत यांचा सवाल

सांगली- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ११ दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर ३ दिवसांनी मतदानाची आकडेवारी कशी वाढली, असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. याबाबत काँग्रेसनेदेखील पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली आहे. मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी आकडेवारी जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने केली.
देशात १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. मतदानाचा कालावधी संपल्यानंतर १९ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात ६० टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले होते. २६ एप्रिलला देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा कालावधी संपल्यानंतर ७ वाजता निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान झाल्याने जाहीर केले. मात्र ३० एप्रिलला आयोगाने जाहीर केले की, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६६ टक्के मतदान झाले. मतदानाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक आकडेवारीपेक्षा हे प्रमाण तब्बल ५ ते ६ टक्के जास्त आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या ११ दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या ३ दिवसांनी निवडणूक आयोगाने मतदानाची नवीन आकडेवारी जाहीर केली. त्यामुळे विरोधी पक्षांकडून आयोगावर टीका केली जात आहे.
संजय राऊत म्हणाले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या २ टप्प्यांतील मतदानाच्या टक्केवारीत ११ दिवसांनी अचानक वाढ झाली. त्यामुळे निवडणूक आयोगावर कसा विश्वास ठेवायचा? हा एक गंभीर विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली निवडणूक यंत्रणा काम करत आहे. निवडणुक आयोगाने जो घोळ सुरू केला आहे, त्यामागे कुठलीतरी अदृश्य शक्ती आहे. ही शक्ती निवडणूक आयोगावर दबाव टाकते. निवडणूक आयोगाने माती खाल्ली आहे. देशभरात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने मतदानाच्या टक्क्यात वाढ झाली. वाढलेले मतदान कोणी केले? कुठे केले? हे खूप धक्कादायक आहे. ईव्हीएम, आचारसंहिता प्रकरणे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने दिलेले निर्णय यात आता आणखी एक भर पडली आहे, ती म्हणजे साधारण ६ टक्के मत अचानक वाढल्याचे दाखवले आहे. मतदानाची टक्केवारी जाहीर करायला ११ दिवस का लागले? पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्या पकडीमध्ये आयोग गुदमरलेला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top