२४ वर्षीय भारतीय वंशाचा तरुण अमेरिकेच्या निवडणूक रिंगणात

वॉशिंग्टन –

भारतात लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. यंदा अमेरिकेतही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात अनेक भारतीय वंशाचे लोक उतरले आहेत. यातील भारतीयवंशाच्या २४ वर्षीय तरुणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. के. अश्विन रामास्वामी असे त्याचे नाव असून तो अमेरिकेतील स्टेट सिनेटच्या निवडणुकीत उतरला आहे. त्याने ही निवडणूक लढण्यासाठी आतापर्यंत २.८० लाख डॉलर म्हणजेच जवळपास अडीच कोटी रुपये जमवले आहेत. ही रक्कम त्याने केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत जमा केली आहे.

अश्विन रामास्वामी स्टेट सिनेटची निवडणूक लढवणारा नव्या पिढीमधील पहिला भारतीय आहे. अश्विन डेमोक्रेट पक्षाकडून जॉर्जियामधील डिस्ट्रिक्ट-४८ मधून स्टेट सिनेटची निवडणूक लढणार आहे. या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे शॉन स्टिल खासदार आहेत. अश्विन आयटी कंपनीत नोकरी करत होता. परंतु भारतीय लोकांच्या सेवेसाठी त्याने नोकरी सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. अश्विनने १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत २.८० लाख डॉलरचा निधी जमा केला आहे. त्याचे विरोधक शॉन स्टिल यांना त्यापेक्षा कमी रक्कम मिळाली आहे. अश्विनने म्हटले की, मी आपल्या लोकांच्या सेवेसाठी सिनेट निवडणूक लढवत आहे. मला नवतरुणांचा पाठिंबा आहे. राजकारणाचा कोणताही गंध नसताना आणि राजकीय पार्श्वभूमी नसताना ते राजकारणात येत आहेत.

अश्विनचे आई-वडील १९९० मध्ये तामिळनाडूमधून अमेरिकेत गेले. त्याचे आई-वडील दोघेही आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. अश्विनने २०२१ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून संगणक शास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर कायद्याची पदवी घेतली. अश्विन रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यासारखे धार्मिक ग्रंथ वाचून मोठा झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top