२६ नोव्हेंबरला हिंगोलीत भरणार ओबीसींचा महाएल्गार मेळावा

मुंबई- मराठा आरक्षण मागणीवरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे आमनेसामने आले आहेत. त्यातच आता ओबीसींच्या जालन्यातील सभेनंतर हिंगोलीत ओबीसींचा महाएल्गार मेळावा भरणार आहे.रविवार २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हिंगोलीतील रामलीला मैदानावर ओबीसी जनमोर्चाची ही पहिली महाएल्गार सभा होणार असल्याची माहिती ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली. ओबीसींच्या हिंगोलीतील या महाएल्गार सभेला ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ,धनगर समाज नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे, कुणबी समाज नेते चंद्रकात बावकर ,लक्ष्मण गायकवाड आणि टी.पी.मुंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.प्रकाश शेंडगे यांनी हिंगोलीची सभा जालन्याच्या सभेपेक्षा भव्यदिव्य असणार असल्याचे सांगितले.यावेळी प्रकाश शेंडगे पुढे म्हणाले की,मराठा समाजाच्या सापडत असलेल्या नोंदींमध्ये काही तरी गोंधळ आहे. कारण शिंदे समितीने सादर केलेल्या अहवालातील कुणबी नोंदी २०१८/१९ च्या असल्याचे सांगितले जात आहेत,परंतु त्या १९६७ च्या नोंदी आहेत.या नोंदी २२,९२९ आणि इतर ४८२९ इतक्या आहेत. या नोंदींचा सरकारने सखोल अभ्यास केला पाहिजे. सरकारने सरसकट कुणबी दाखले देणार नसल्याचे आम्हाला सांगितले आहे, पण जर तसे झाले नाही तर आगामी निवडणुकीत सरकारला ओबीसींची ताकद दाखवली जाईल असा इशाराच शेंडगे यांनी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top