४० टक्के निर्यात शुल्क लावून कांदा निर्यातीस केंद्राची परवानगी-भाव ७५० रुपयांनी वाढले

नवी दिल्ली

ऐन निवडणुकीत केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली असून आता सर्वच देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, काल केंद्राने या निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क लागू केले आहे. मेट्रिक टनाला ५५० डॉलर किमान निर्यातशुल्क आकारले जाणार आहे. याबाबत परदेशी व्यापार महासंचालनालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान आज निर्यात बंदी हटवताच लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात ७५० रुपयांनी वाढ झाली.

मागील वर्षी ऑगस्टमध्ये भारताने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्‌क लागू केले होते. केंद्राने देशांतर्गत बाजारात कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदी लागू केली होती. आता ही निर्यातबंदी हटवली असली तरी दुसरीकडे मोठे निर्यातशुल्क लागू केले आहे. केंद्राने नुकतीच बांगलादेश, पूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये ९९,१५० मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याची वाढलेली मागणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय खूप उशिरा घेतल्याचे आणि निर्यात मर्यादा खूप कमी असल्याचे शेतकर्यांनी म्हटले होते. कांदा निर्यात सुलभ होण्यासाठी नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (एनसीईएल) ही एजन्सी नियुक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top