७ महिन्यांपासून कोरडे पडलेले नाझरे धरण १०० टक्के भरले

पुणे – जेजुरी, पुरंदर आणि बारामती तालुक्यांतील ७२ वाडी-वस्ती आणि गावांना पाणीपुरवठा करणारे नाझरे धरण १०० टक्के भरले. या धरणाच्या स्वयंचलित सांडव्यातून पाणी कऱ्हा नदी पात्रात यायला सुरूवात झाली.चार-पाच दिवसांपासून पुरंदरच्या पश्चिम भागात म्हणजेच पुरंदर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नाझरे धरण पूर्णपणे भरून आता त्याच्या सांडव्यातून पाणी कऱ्हा पात्रात जाऊ लागले आहे. त्यामुळे पुरंदर आणि बारामतीच्या जनतेला दिलासा मिळाला. सहा ते सात महिन्यांपासून नाझरे धरण कोरडे पडले होते. आता हे धरण १०० टक्के भरल्याने पुरंदरसह बारामतीतील ७२ वाड्या-वस्ती आणि गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला. नाझरे धरण पूर्ण भरल्याची माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांनी धऱणातील या पाण्याचे पूजन केले.