Home / News / Indian Medicines :भारतीय औषधांवर 100 % कर; ट्रम्पचा पुन्हा धक्का! जेनेरिक वगळले

Indian Medicines :भारतीय औषधांवर 100 % कर; ट्रम्पचा पुन्हा धक्का! जेनेरिक वगळले

Indian Medicines – अमेरिकेने भारताला पुन्हा मोठा झटका दिला आहे. भारतातून अमेरिकेत येणाऱ्या ब्रँडेट व पेटंट औषधांवर 100 टक्के कर...

By: Team Navakal
Indian Medicines


Indian Medicines – अमेरिकेने भारताला पुन्हा मोठा झटका दिला आहे. भारतातून अमेरिकेत येणाऱ्या ब्रँडेट व पेटंट औषधांवर 100 टक्के कर आकारण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump)यांनी आज केली आहे. जेनेरिक औषधांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. भारत हा अमेरिकेचा जेनेरिक (Generics)औषधांचा सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे. त्यामुळे भारतावर या निर्णयाचा लगेच परिणाम होणार नाही, पण इतर औषधांवर थेट 100 टक्के कर लावल्याचा फटका भारताला बसणारच आहे.


भारताचे औषधनिर्मिती क्षेत्र हे बहुतांश अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर अवलंबून आहे. मात्र येत्या 1 ऑक्टोबरपासून औषधांवर 100 टक्के कर (100% tariff) लागू होणार आहे. याआधी अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 टक्के कर लागू केला होता. पण त्यातून औषधनिर्मिती क्षेत्राला वगळले होते.


ज्या कंपन्या अमेरिकेतच (America)आपले कारखाने सुरू करत आहेत, त्यांना मात्र यातून सूट देण्यात आली आहे. म्हणजेच ज्यांच्या कारखान्याचे भूमिपूजन झाले आहे, बांधकाम सुरू आहे, त्या कंपन्यांना या निर्णयाचा फटका बसणार नाही. ट्रम्प यांनी हे भरमसाट आयात शुल्क का लावले यामागचे कोणतेही कारण स्पष्ट केले नाही. पण गेल्या काही काळापासून ते राबवत असलेल्या अमेरिका फर्स्ट आणि मेक इन अमेरिका या धोरणांतर्गत राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.


याआधी ट्रम्प सरकारने 27 ऑगस्टपासून भारताच्या कपडे, जेम्स-ज्वेलरी, फर्निचर आणि सी-फूड यासारख्या उत्पादनांवर 50 टक्के आयात शुल्क लावले होते. यामधील 25 टक्के कर हा भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे शिक्षा म्हणून लावण्यात आला आहे. पण अमेरिकेने तेव्हा पूर्णतः अवलंबून असलेल्या औषधांना मात्र त्यातून वगळले होते. आजच्या निर्णयाने अमेरिका हे अवलंबित्व दूर करून देशातच तातडीने औषध पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. पण त्यामुळे येत्या काळात भारतीय औषधनिर्माण क्षेत्राचे पुरते कंबरडे मोडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


ट्रम्प यांनी आजच्या घोषणेतून जेनेरिक औषधांना वगळले आहे. कारण ती ब्रँडेड औषधांपेक्षा 80% ते 90% स्वस्त आहेत. त्यांच्यावरही आयात शुल्क लावले असते तर अमेरिकन नागरिकांसाठी आरोग्यसेवा खूप महाग झाली असती. कारण अमेरिकी आरोग्य क्षेत्र हे जेनेरिक औषधांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांनी आज मोठ्या ट्रकच्या आयातीवर 25 टक्के आणि किचन कॅबिनेट, बाथरूम व्हॅनिटी तसेच अपहोल्स्टर्ड फर्निचर म्हणजेच फोम, कापसापासून बनवलेल्या फर्निचरवर 30 टक्के ते 50 टक्के शुल्क लावण्याचीही घोषणा केली आहे.


10 पैकी 4 औषधे भारतीय

भारत हा जेनेरिक औषध क्षेत्रात अमेरिकेचा सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे. 2024 मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे 8.73 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 77 हजार कोटी रुपये किमतीची औषधे निर्यात केली. भारताच्या एकूण औषध निर्यातीमध्ये हा वाटा 31 टक्के आहे. अमेरिकेत डॉक्टर जे प्रिस्क्रिप्शन लिहितात त्यापैकी दर 10 पैकी जवळपास 4 औषधे ही भारतीय कंपन्यांची असतात. डॉ. रेड्डीज (Dr. Reddy’s), सन फार्मा (Sun Pharma)आणि ल्यूपिन यासारख्या भारतीय कंपन्या काही पेटंट असलेली औषधेही अमेरिकेत विकतात. यामध्ये मधुमेहावरील औषधे, हर्बल, आयुर्वेदिक, लसी, अँटीबायोटिक, संसर्गावरील औषधांचा समावेश आहे. त्यामुळे या निर्णयाचा त्यांच्यावर थेट परिणाम होणार आहे.


हे देखील वाचा – 

‘तुम्ही तेही नाही करू शकणार!’: शोएब अख्तरने केली ‘ती’ चूक अन् अभिषेक बच्चनने पाकिस्तानची उडवली खिल्ली

सोनम वांगचुक यांच्या अटकेमुळे चर्चेत आलेला ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ नेमका काय आहे? जाणून घ्या

‘पूरग्रस्तांना तातडीची मदत करा’; शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला, म्हणाले…

Web Title:
संबंधित बातम्या