11 दिवसांनी मतदानाचा आकडा वाढतो कसा? निवडणूक आयोगावर संशय! राष्ट्रपतींकडे तक्रार

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले असून, मतदानाची अधिकृत टक्केवारी इतकी कशी वाढते? हा सवाल सर्वच विरोधी पक्ष निवडणूक आयोगाला विचारू लागले आहेत. यंदा मतदान कमी झाले याचा फटका भाजपाला बसणार अशी चर्चा सुरू असतानाच निवडणूक आयोगाने मतदानाची वाढीव टक्केवारी जाहीर करायला सुरुवात केल्याने आयोगाबाबत संशय निर्माण झाला आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी याप्रकरणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडेच दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग किती मतदान झाले ते लगेच जाहीर करते. हा प्राथमिक अंदाज वर्तविल्यावर आयोग पुन्हा मतदानाची आकडेवारी जाहीर करते जी अंतिम असते. पहिली आकडेवारी आणि दुसरी आकडेवारी यात जेमतेम एक टक्का फरक असतो. याचे कारण मतदानाची वेळ संपल्यावरही अनेकजण रांगेत असतात जे मतदान करतात. पण यावेळी पहिल्या आणि दुसऱ्या मतदान आकडेवारीत 8 ते 10 टक्के इतका प्रचंड फरक आहे. मतदान केंद्रावर रांगेतील शेवटच्या मूठभर मतदारांमुळे इतका फरक होऊच शकत नाही.
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर संशय व्यक्त करताना आकडेवारीच सादर केली. पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिलला झाले. त्यावेळी सायंकाळी 5 वाजता मतदानाची वेळ संपल्यावर आयोगाने 54.34 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर 11 दिवसांनी अंतिम मतदान आकडेवारी सांगताना 9.37 टक्के मतदान वाढवून 63.71 टक्के मतदान झाल्याचे सांगितले. 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचे मतदान संपताच आयोगाने 53.71 टक्के मतदान झाल्याचे सांगितले आणि चार दिवसांनंतर अंतिम टक्केवारी देताना 62.71 टक्के मतदान झाल्याचे घोषित केले. पहिले आणि दुसऱ्या मतदान टक्क्याच्या आकडेवारीत 9 टक्क्यांचा फरक आहे. याबाबत तक्रारी होऊ लागल्या. मतदान झाल्यावर अंतिम आकडेवारी चार दिवसांनी, अकरा दिवसांनी का जाहीर होत आहे? आयोगाने त्याच दिवशी अंतिम आकडेवारी जाहीर करायला हवी, अशी मागणी होऊ लागली. मात्र तरीही तिसऱ्या टप्प्यावेळी बदल झाला नाही.
7 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होताच सायंकाळी 5 वाजता निवडणूक आयोगाने 53.40 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री 9 वाजता त्यांनी अतिम टक्केवारी जाहीर केली जी 8.04 टक्के वाढीव होती. सायंकाळी 5 वाजता 53.40 टक्के मतदान आणि रात्री 9 वाजता 61.44 टक्के मतदान झाल्याचे आयोगाने सांगितले. दोन्ही आकड्यात आठ टक्के इतकी प्रचंड तफावत असल्याने पुन्हा आयोगावर ताशेरे ओढत संशय व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top