20 जानेवारीला मराठा वादळ मुंबईत धडकणार आझाद मैदानावर उपोषण! तुफान सभेत जरांगेंची घोषणा

बीड – मातब्बर राजकारण्यांना जेवढी गर्दी खेचता आली नाही तेवढी अतिप्रचंड गर्दी आज मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेला उसळली होती. ‘सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे’ या घोषणा गुंजत होत्या. जरांगे-पाटील यांनी जाहीर केले की, 20 जानेवारीला मराठ्यांचा महाप्रलय मुंबईला धडकेल. आझाद मैदान, शिवाजी पार्कवर आमरण उपोषण सुरू होईल आणि आरक्षण मिळाल्याशिवाय परतणार नाही. जर मुंबईत तुमच्या पोराला त्रास दिला तर माऊलींनो, इथे आमदार, खासदाराच्या घरात घुसा. या सभेत जरांगे-पाटील यांनी ‘बुजगावनं, येवल्याचं येडपट’ अशा खालच्या शब्दात छगन भुजबळांवर टीका केली.
मनोज जरांगे-पाटील सभेत म्हणाले की, मराठ्यांचे वादळ, मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय आपल्या लेकरांना न्याय मिळवण्यासाठी आला आहे. आपल्यावर घरे जाळल्याचा खोटा आरोप करून डाग लावला. निष्पाप मुलांवर गुन्हे दाखल करण्याचे पाप सरकारने केले. मराठ्यांना शांतता हवी आहे. हे कधी जाळपोळ करू शकत नाहीत. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही शांततेत आंदोलन करू. आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. सरकारला विनंती आहे की नवीन नवीन पद्धत राबवू नका. अंतरवालीतील प्रयोग भोगावा लागला आहे. ठरल्याप्रमाणे आरक्षण द्या. नाहीतर पुढचे आंदोलन जड जाईल. आज फक्त बीड जिल्ह्याची ताकद दाखविली. मी मॅनेज होत नाही ही त्यांची समस्या आहे. आता शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे. आरक्षण दिले नाही तर जिल्ह्यातून, घरातून मराठी रस्त्यावर उतरतील.
पण सरकार मराठा समाजाची फसवणूक करीत आहे. सरकारला वठणीवर आणण्याची ताकद मराठ्यात आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, मागास सिद्ध झाले नाहीत त्यांना आरक्षण दिले. पण मराठ्यांना आरक्षण दिले नाही. आपल्याला आंदोलन करायचे आहे, परंतु शांततेत करायचे. पण मागे हटायचे नाही. आम्ही किती दिवस सहन करायचे? त्यांनी मुंबईला 18 तारखेपर्यंत जमावबंदीचे 144 कलम लावले. मग आता 20 जानेवारीला मुंबईत जाऊन आमरण उपोषण करायचे. घराची, शेतीची व्यवस्था करा. 15 दिवसांचे नियोजन करा. 20 जानेवारीला हा मराठ्यांचा जनसागर जाणार आहे. आझाद मैदान, शिवाजी पार्कला आम्ही उपोषणाला बसणार आहोत. मराठी तिकडे भेटायला येणार आहेत. पण आंदोलन शेतात करायचे. आपल्याला माघारी यायचे नाही. तीन कोटी मराठी मुंबईला धडकणार आहेत. जर कुणाला अटक केली तर सर्वांनी पोलिसांच्या गाडीत जाऊन बसायचे. जो नेता पाठीशी उभा राहणार नाही, त्याला दारातही उभे करायचे नाही. 20 जानेवारीला गाव सोडले तर आरक्षण घेऊनच परत येऊ. तेव्हा त्याआधी आरक्षण द्या.
जरांगे-पाटील यांनी इशारा दिला की या आंदोलनात खोडा घालू नका. मराठ्यांनी कुठेही स्वतंत्र चर्चा करू नये. स्वतंत्र निर्णय घेऊ नका. जी चर्चा होईल ती खुलेपणानेच होईल.

सगेसोयरे विषयावर जरांगे बोललेच नाहीत
जरांगे-पाटील यांच्या सभेनंतर आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली की, क्युरेटिव्ह पीटिशन सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतले हा फार मोठा दिलासा आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, अशी आमची सुरुवातीपासून भूमिका आहे आणि ही क्युरेटिव्ह पीटिशन त्यासाठीच आहे. मागील सरकारच्या वेळेस ज्या त्रुटी आढळल्या आणि जो अडथळा सुप्रीम कोर्टाने निर्माण केला तो अडथळा सुप्रीम कोर्टच दूर करू शकेल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल. पण आजच्या सभेत जरांगेंनी सगेसोयरे या विषयावर चकार शब्द काढला नाही याचे आश्चर्य वाटले. बाकी त्यांच्याकडे भाषणात बोलण्याचा विषय नव्हताच. त्यामुळे अर्ध्याअधिक भाषणात मला शिव्या दिल्या. पण छगन भुजबळ कोणत्याही कोल्हेकुईला भीक घालत नाही.

बीडमधील शाळा बंदच्या
आदेशाला भुजबळांचा आक्षेप

मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी बीडमधील शाळांना बंदचे आदेश देण्यात आले होते. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले. भुजबळ म्हणाले, एका समाजातील काही ठराविक लोकांच्या दबावाला, झुंडशाहीला आपला कायदा, प्रशासन बळी पडतेय का, असे असेल तर हे निश्चितच लोकशाहीला धरून नाही. कोणत्याही सभेसाठी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्याचे कारण काय? सभा घेण्यावर आक्षेप नाही. पण, त्यासाठी थेट शाळा बंद ठेवणे किंवा सुट्टी जाहीर करणे नक्कीच चुकीचे आहे. वकील गुणरत्न सदावर्ते हेही विरोध करत म्हणाले की, राईट टू एज्युकेशन अधिकारानुसार अशाप्रकारे शाळा बंद ठेवणे गैर आहे. हा निर्णय घेणारे बीडचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांचे निलंबन करावे. दरम्यान, आज बीडमधील सर्व एसटी बसेसच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

संयम बाळगा
मुख्यमंत्र्यांचे आवाहन

क्युरेटिव पीटिशन 24 जानेवारीला सुप्रीम कोर्ट ऐकणार आहे. मराठा समाजासाठी हा फार मोठा दिलासादायक निर्णय आहे. 24 तारखेला वकिलांची फौज सरकारची बाजू मांडेल. मराठा समाज मागास कसा आहे, ते सांगेल. यातून मराठा समाजाला न्याय मिळेल, असा मला विश्वास आहे. तोपर्यंत सर्वांनी संयम राखावा. कायदा-सुव्यवस्था राहिली पाहिजे. जातीय तेढ निर्माण होऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटील यांच्या सभेनंतर केले.

जरांगे-पाटलांची
फडणवीसांना विनंती

जरांगे पाटील म्हणाले की, आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, अंतरवालीत जे केले ते करण्याचा प्रयत्न करू नका. आरक्षण देण्यासाठी मार्ग काढा.

कोल्हापुरात आजपासून
जमावबंदीचा आदेश

मराठा आरक्षणाबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. उद्या पहाटे 4 वाजल्यापासून हे आदेश लागू करण्यात येणार असून ते 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत असतील. हे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी दिले आहेत.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्या, या मागणीसाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. जरांगे-पाटील यांनी दिलेली ही मुदत उद्या संपत आहे, मात्र अद्यापही मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे उद्यापासून आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात शांततेचे पालन व्हावे तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
सभेपूर्वी जरांगेंनी मोठी रॅली काढली. दुपारी दोन वाजता सभा सुरू होणार होती, पण ती साडेचारला सुरू झाली. सुमारे 200 जेसीबींमधून जरांगेंवर फुलांची उधळण करण्यात आली. सभास्थळी तरुण आणि तरुणींनी 30 किलो रांगोळीचे रंग वापरुन छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे यांची हुबेहूब रांगोळी साकारली होती. जरांगे व्यासपीठावर येताच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. ’लढेंगे, जीतेंगे, हम सब जरांगे’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

संसदेत कायदा करा
दिशाभूल करू नका

उबाठा गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, सरकार जरांगेंची दिशाभूल करीत आहे. आरक्षण देण्यासाठी केंद्राने कायदा करणे गरजेचे आहे. तो सरकारने करावा.

भुजबळांच्या डोक्यात
गटार भरले आहे

सभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांच्यावर कडवी टीका करताना जरांगे म्हणाले की, तुझ्या डोक्यात इतके गटार भरले आहे हे माहित नव्हते. मराठ्यांनी तुला मोठे केले तेव्हा त्यांच्याविषयी तुझ्या मनात वाईट आहे हे माहीत नव्हते. विखे पाटलांना कितीवेळा सांगितले की पुरावे तपासायला अ‍ॅप तयार करा. करतो, करतो म्हणाले आणि आजपर्यंत केले नाही.

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
मनोज जरांगे यांच्यासोबतच्या भेटीनंतर आज माध्यमांशी बोलताना प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. ते म्हणाले की, सरकारला आता जर एखादा शब्द द्यायचा असेल तर आधी त्याचा पूर्ण विचार करून द्यावा. शब्द दिला आणि तो पूर्ण करू शकलो नाही तर त्याचा समाजमनावर परिणाम होतो. लोकांच्या मनात सरकारविरोधात भावना निर्माण होतात. उग्र प्रतिक्रिया उमटू लागतात. सगेसोयरे शब्दाबाबत माझा देखील गैरसमज झाला होता, सगेसोयरे यांची व्याख्या काय आहे, तर वडिलांच्या संबंधातील नात्या- गोत्यातील सर्वजण. ज्याच्यासोबत सोयरिक होऊ शकते ते सोयरे. सगे म्हणजे आपले सगळे. वडील, काका, पुतण्या, मुलगी आणि तिचे मामा हे सगेसोयरे. पण आईच्या जातीबाबत माझी मान्यता नाही, ते शक्यही नाही. एका घरात दोन जाती होऊ शकत नाहीत. आईची जात पोरांना लावली जाऊ शकत नाही, त्यांचा वेगळा अर्थ काढला गेला, तो चुकीचा आहे. मी आंदोलक म्हणून मनोज जरांगे यांची भेट घेतली. माझी भूमिका एका कार्यकर्त्याची आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top