22 जानेवारीला केंद्रीय कर्मचार्‍यांना अर्धा दिवस सुट्टी अयोध्येच्या राममंदिर गर्भगृहात मूर्ती विराजमान

अयोध्या – श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. अवघ्या देशाला या सोहळ्यात सहभागी होता यावे म्हणून केंद्र सरकारने सर्व केंद्रीय कर्मचारी, केंद्रीय संस्था आणि उद्योगांना 22 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. आता महाराष्ट्र सरकार सुट्टीबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, अयोध्येत आज श्रीरामाची बालरुपातील नेत्रदीपक मूर्ती गर्भगृहात विराजमान झाली.
भारत सरकारचे उपसचिव परवीन जरगार यांच्या सहीने केंद्र सरकारने सुट्टीचे परिपत्रक जारी केले. यात म्हटले आहे की, 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून, याचा उत्सव देशभरात साजरा होणार आहे. या उत्सवात सहभागी होता यावे म्हणून केंद्रीय कर्मचार्‍यांना या दिवशी दुपारी 2.30 पर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशातील काही राज्यांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये 22 जानेवारीला सरकारी कार्यालये, शाळा महाविद्यालयांना सुट्टी आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि गोव्यात 22 जानेवारीला शाळा बंद आहेत. महाराष्ट्रात मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
दरम्यान, जेथे भगवान श्रीरामाचा जन्म झाला, त्या अयोध्या नगरीतील भव्य मंदिराच्या गर्भगृहात श्रीरामाची बालरुपातील नेत्रदीपक मूर्ती आज विराजमान झाली. ही रामलल्लाची मूर्ती लाखो भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणार आहे. मात्र या मूर्तीचे दर्शन 22 जानेवारीला होणार आहे. तत्पूर्वी आज अनुष्ठानाच्या तिसर्‍या दिवशी विविध पूर्जा-अर्चना करून या मूर्तीची गर्भगृहात स्थापना करण्यात आली. काल श्रीरामाची मूर्ती जय श्रीरामाच्या जयघोषात हनुमान गढीच्या मार्गाने मंदिर परिसरात आणण्यात आली. मंदिर परिसरात आणल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ती बाहेर काढली. मूर्ती तब्बल 200 किलो वजनाची असल्याने शिवाय सुरक्षेच्या कारणास्तव तिची अयोध्या परिक्रमा करण्यात आली नाही. गर्भगृहात आज आसन पूजन करून तीर्थपूजन, जल यात्रा आणि गंधाधिवास या विशिष्ट प्रकारच्या पूजा पार पाडल्यानंतर मूर्ती गर्भगृहात स्थापित
केली गेली.
आज तिसर्‍या दिवशी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी संकल्पाद्वारे पूजाविधींना सुरुवात झाली. त्यानंतर गणेशाम्बिकापूजन, वरुणपूजन, चतुर्वेदोक्त पुण्याहवाचन, मातृकापूजन, वसोर्धारापूजन (सप्त घृत मातृका पूजन), आयुष्यमन्त्रजप, नान्दीश्राद्ध, आचार्यादिचऋत्विग्वरण,
मधुपर्कपूजन, मण्डपप्रवेश, पृथ्वी- कूर्म- अनन्त- वराह-यज्ञभूमि-पूजन, दिग्ररक्षण, पंचगव्य – प्रोक्षण, मण्डपाङ्ग वास्तुपूजन, वास्तु बलिदान, मण्डप सूत्रवेष्टन, दुग्ध- धारा, जलधाराकरण, षोडशस्तम्भपूजनादि मण्डपपूजा (तोरण, द्वार, ध्वज, आयुध, पताका, दिक्पाल, द्वारपालादिपूजा), मूर्तीचा जलाधिवास, गंधाधिवास आदि पूजाविधी पार पडले. उद्या 19 जानेवारीला हवन व पुढील अनुष्ठान विधी होईल.

राम मंदिराच्या विशेष
टपाल तिकिटाचे अनावरण

अयोध्येमधील राममंदिर लोकार्पणापूर्वी राम मंदिराच्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. टपाल तिकिटांवर राममंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज आणि शबरी, चौपई मंगल भवन अमंगल हरी, सूर्य, शरयू नदी आणि मंदिराच्या परिसरातील शिल्प यांची चित्रे आहेत. तिकिटाचे अनावरण केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित सहा टपाल तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली. जगभरात श्रीरामावर आधारित असणार्‍या सर्व टपाल तिकिटांचा एक अल्बम प्रसिद्ध करण्यात आला आहे. पुढील पिढीसाठी ही आठवण राहील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top