इंदूरमध्ये ७५ विद्यार्थ्यांची पुन्हा नीट-यूजी परीक्षा

NEET-UG Exam

इंदूर – मध्य प्रदेशच्या इंदूर येथील ७५ विद्यार्थ्यांसाठी नीट-यूजी परीक्षा (NEET-UG Exam)पुन्हा घेण्याचे आदेश मध्य प्रदेश न्यायालयाच्या उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court)दिले आहेत. या विद्यार्थ्यांनी ३ जूनपूर्वी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती.

४ मे रोजी झालेल्या परीक्षेदरम्यान इंदूर (Indore)आणि उज्जैनमधील (Ujjain) अनेक परीक्षा केंद्रांवर वीजपुरवठा खंडित झाला होता. या घटनेमुळे परीक्षेत व्यत्यय आल्याचे विद्यार्थी व त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. एनटीएच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Tushar Mehta)व पॅनल वकिलांनी, पॉवर बॅकअपची (power backup) व्यवस्था होती, असे सांगितले. मात्र विद्यार्थ्यांचे वकील मृदुल भटनागर यांनी याला आक्षेप घेतला. त्यांनी न्यायालयात केंद्र निरीक्षकांचा अहवाल दाखवला. ज्यात अनेक ठिकाणी जनरेटरच नसल्याचे नमूद होते.
या प्रकरणात १५ मे रोजी न्यायालयाने निकालावर स्थगिती दिली. एनटीएनेही पुढील सुनावणीत मान्य केले की कित्येक केंद्रांवर १० मिनिटांपासून १ तासापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला. यानंतर याचिकांची संख्या सातत्याने वाढत गेली आणि एकूण ८५ विद्यार्थ्यांनी याचिका (petition) दाखल केली.
परीक्षेच्या अडचणी समजून घेण्यासाठी मागच्या सुनावणीत न्यायाधीशांनी न्यायालयाच्या खोलीत वीज बंद करून प्रश्नपत्रिका वाचली. आजच्या निकालात न्यायालयाने स्पष्ट केले की परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसतानाही, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोठी गैरसोय झाली. त्यामुळे ३ जूनपूर्वी याचिका दाखल केलेल्या ७५ विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचा आदेश देण्यात आला असून निकाल लवकरच जाहीर करण्याचे निर्देशही एनटीएला दिले.